उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपल्या संस्थांचे नाव खराब करण्याच्या आणि प्रतिमा डागाळण्याच्या अनिष्ट  प्रयत्नांबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली उद्विग्नता


भारतविरोधी अपप्रचाराबाबत न्याय्य भूमिका घेऊन तो शमवण्याचे, उपराष्ट्रपतींचे नागरिकांना आवाहन

Posted On: 06 AUG 2023 8:09PM by PIB Mumbai

 

आपल्या संस्थांचे नाव खराब करण्याच्या आणि प्रतिमा डागाळण्याच्या अनिष्ट  प्रयत्नांबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उद्विग्नता  व्यक्त केली आहे.  भारतविरोधी अपप्रचाराबाबत न्याय्य भूमिका घेण्याचे आवाहन करत, हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी मागे पुढे पाहू नका असे आवाहन  उपराष्ट्रपतींनी नागरिकांना केले आहे. "असा अविचार करणाऱ्या समाजविघातक शक्तींचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तुम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडा", असे ते म्हणाले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ग्रंथालय महोत्सव 2023 च्या समारोप सोहळ्याला संबोधित करताना ते आज बोलत होते.

देशाचा अभूतपूर्व विकास होत असताना अशी प्रतिकूल आव्हाने तर उभी ठाकणारच, असे सांगून उपराष्ट्रपतींनी, राष्ट्रवाद आणि राष्ट्रहिताचा विचार करताना पक्षपाती दृष्टिकोन बाळगू नये, असे प्रत्येकाला आवाहन केले.  राजकीय क्षेत्रात राजकीय पक्षपात  समजण्यासारखा आहे, मात्र राष्ट्राच्या विकासात सहभागी होताना त्यात राजकारण येता कामा नये.  राष्ट्रहितासाठी आपण नेहमी आघाडीवर असले पाहिजे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर आपण सरळ बॅटनेधैर्याने आणि आत्मविश्वासाने खेळले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

आजूबाजूच्या परिस्थितीची आणि घडामोडींची यथार्थ जाण असणारे नागरिक म्हणजे कुठल्याही लोकशाही व्यवस्थेचा भरभक्कम कणा असतात असा उल्लेखधनखड यांनी  केला.

संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे जिथे दोन्ही बाजूने वादविवाद, चर्चा, परस्पर संवाद व्हायला हवा असे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की संसदेच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचे अडथळे, गोंधळ आणि व्यत्यय  येऊ नयेत, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.

वसाहतवादी राजवटीत प्रतिबंध घालण्यात आलेल्या, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या लेखनावर आधारीत कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.  हे कॉफी टेबल बुक म्हणजे  आपली राज्यघटना आणि स्वातंत्र्यसैनिकांना सार्थ मानवंदना आहे असे वर्णन करत, "आपली मूल्ये, स्वातंत्र्य याबाबतच्या भारतीय प्रतिभेचा, हे पुस्तक सर्वात अधिकृत दस्तावेज आहे", असे  उपराष्ट्रपती म्हणाले.

केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946246) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil