युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना आणि खेलो इंडिया योजनेतील लाभार्थ्यांची 31व्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी

Posted On: 04 AUG 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

 

सध्या चालू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत (3 ऑगस्ट) भारताने 4 क्रीडा प्रकारात एकूण 23 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी नेमबाजीत सर्वाधिक 14 पदके जिंकली आहेत ज्यात 8 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने नेमबाजी खालोखाल तिरंदाजीमध्ये 7 पदके तर ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये प्रत्येकी 1 पदक पटकावले आहे. भारताने या स्पर्धेसाठी एकूण 256 खेळाडू पाठवले होते.

या 23 पदकांपैकी 14 पदके खेलो इंडिया क्रीडापटूंनी मिळवली आहेत, तर नेमबाजीतील सर्व पदके (14) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेतील (TOPS) क्रीडापटूंनी पटकावली आहेत. भारताची सर्वाधिक व्यक्तिगत पदक संख्या (3 सुवर्ण पदकांसह 4 पदके) टॉप्स नेमबाज ऐश्वर्य  प्रताप सिंह  तोमर या क्रीडापटूची आहे.

खेलो इंडिया क्रीडापटू आणि तिरंदाज अमन सैनी याने 3 पदके जिंकून भारतीय चमूच्या यशात मोठे योगदान दिले आहे. टीम इंडियाच्या एकत्रित कामगिरीमुळे स्पर्धेचे  पहिले 5 दिवस भारत पदकतालिकेत अव्वल 5  स्थानांमध्ये  होता.

यापूर्वी 2015 च्या विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडापटूंच्या एकत्रित प्रयत्नांमुळे 5 पदकांसह भारताने  सर्वोत्तम कामगिरी सुनिश्चित केली होती.

1959 मध्ये जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून, 2019 च्या  क्रीडा स्पर्धापर्यंत  (30 वी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा) भारताने एकूण 18 पदके जिंकली. मात्र , सध्या सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या 31व्या आवृत्तीत, भारताने आतापर्यंत (3 ऑगस्ट) एकूण 23 पदकांची ऐतिहासिक कमाई केली आहे. 

सध्याचे खेलो इंडियामधील एकूण 71 क्रीडापटू या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, तलवारबाजी, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस आणि व्हॉलीबॉल यासह विविध क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील ज्युडोमधील रौप्यपदक विजेती तुलिका मान, टोकियो ऑलिम्पिक जलतरणपटू श्रीहरी नटराज तसेच भारतीय नेमबाज बंधुद्वय उदयवीर आणि विजयवीर सिद्धू ही काही प्रमुख नावे आहेत, जी या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली आहेत.

खेलो इंडिया योजना हा एक प्रमुख सरकार अनुदानित कार्यक्रम आहे. भारतातील क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अलिकडच्या काळात ही योजना खूप यशस्वी झाली आहे. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवडले गेलेले खेळाडू हे देशातील काही सर्वोत्तम तरुण प्रतिभावंत आहेत.

श्रीहरी गेल्या अनेक वर्षांपासून खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. मनू भाकरनेही खेलो इंडियाच्या दोन्ही वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा हा खेलो इंडिया क्रीडापटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा मंच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे काही खेळाडू देखील जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत स्पर्धक होते.

भारतीय युवा खेळाडू जगभरातील काही सर्वोत्तम युवा खेळाडूंशी स्पर्धा करत आहेत आणि या स्पर्धेत आपली छाप उमटवू पाहत आहेत.

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945946) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada