आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रणावरील अद्ययावत माहिती
724 जिल्हा एनसीडी क्लिनिक, 210 कार्डियाक केअर सेंटर, 326 जिल्हा डे केअर सेंटर आणि 6110 सामुदायिक आरोग्य केंद्र एनसीडी क्लिनिक्सची स्थापना
2009-10 ते 2016-17 पर्यंत तंबाखू सेवनाच्या प्रमाणात 2020 साठीच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक म्हणजेच 17.3% सापेक्ष घट
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2023
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चा एक भाग म्हणून असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमा (NP-NCD) अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. हे सहाय्य राज्ये /केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर आणि संसाधनाच्या उपलब्धतेवर आधारित आहे.
या कार्यक्रमात पायाभूत सुविधा मजबूत करणे, मनुष्यबळ विकास, आरोग्य संवर्धन आणि रोगप्रतिबंधासाठी जागरूकता, लवकर निदान, व्यवस्थापन आणि योग्य स्तरावरील आरोग्य सेवा सुविधेकडे रुग्ण संदर्भीत करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. असंसर्गजन्य रोगांच्या (NCDs) उपचारांसाठी जिल्हा स्तर आणि त्याखालील विविध उपक्रमांसाठी राज्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 60:40 (पूर्वोत्तर आणि डोंगराळ राज्यांमध्ये 90:10) या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जाते. असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमा (NP-NCD) अंतर्गत, 724 असंसर्गजन्य आजार रुग्णालय, 210 कार्डियाक केअर सेंटर, 326 जिल्हा डे केअर सेंटर आणि 6110 सामुदायिक आरोग्य केंद्र असंसर्गजन्य आजार रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य धोरण (NHP), 2017 मध्ये 2010 च्या आधारभूत पातळीपासून 2020 पर्यंत तंबाखू सेवनात 15% आणि 2025 पर्यंत 30% घट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. जागतिक प्रौढांमधील तंबाखू सेवनाच्या अहवालाच्या दुसऱ्या फेरीच्या सर्वेक्षण अहवालानुसार (GATS- 2), 2009-10 ते 2016-17 या कालावधीत तंबाखू सेवनाच्या प्रमाणात 17.3% सापेक्ष घट झाली आहे. त्यामुळे 2020 साठी निर्धारित केलेले उद्दिष्ट वेळेआधीच साध्य झाले आहे. 2025 पर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे.
राष्ट्रीय आरोग्य धोरण (2017) नुसार 2025 पर्यंत हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, मधुमेह किंवा तीव्र श्वसन आजार यासारख्या असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण 25% कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1945835)
आगंतुक पटल : 345