सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय आरोग्यविषयक संवाद शिखर परिषद आणि महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र याविषयी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोलमेज बैठक संपन्न

Posted On: 03 AUG 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023

नवी दिल्लीत उद्योग भवनात काल 2 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि आरोग्य सेवा उद्योग क्षेत्रातील जगभरातील अग्रणी उद्योजकांमध्ये गोलमेज बैठक झाली. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, इंडिया चेंबर ऑफ बिझनेस अँड कॉमर्स (इंडिया चेंबर), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारतीय वैद्यकीय संघटनेने संयुक्तपणे या गोलमेज बैठकीचे आयोजन केले होते. भारतात होणाऱ्या आगामी भारतीय आरोग्यविषयक संवाद शिखर परिषद [India Health Dialogue Summit (IHD) - इंडिया हेल्थ डायलॉग समिट (आयएचडी)] तसेच महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र अर्थात ग्लोबल मेड टेक झोन [Global Med Tech Zone (MGMTZ)] जिथे जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन घेतले जाईल असे केंद्र विकसित करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

भारताला वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनाच्या बाबतीतले जगातले नवे महत्वाचे केंद्र बनविण्यासाठी तसेच आरोग्य सेवा क्षेत्राच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी, भारताची आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित उत्पादनक्षमता अधिक मजबूत करण्यावर सरकारने भर दिला असल्याचे केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या बैठकीत बोलताना सांगितले. त्यादृष्टीनेच महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र अर्थात ग्लोबल मेड टेक झोन [Global Med Tech Zone (MGMTZ)] निर्मितीच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा उद्योगक्षेत्रातल्या अग्रणी संस्थांनी गुंतवणूक करावी असे आवाहन नारायण राणे यांनी केले, तसेच सर्व गुंतवणूकदारांना सरकारकडून आवश्यक ते सहकार्यही दिले जाईल असेही आश्वस्त केले.

इंडिया चेंबरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पांगोत्रा यांनीही या गोलमेज बैठकीत आपले म्हणणे मांडले. डिजिटल आणि स्मार्ट माध्यमांचा वापर करून आरोग्यविषयक सेवांचा पुरवठा, तंत्रज्ञानाधारीत आणि अभिनवतेचा अंतर्भाव असलेली उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि अत्यंत गंभीर आजारांवरच्या उपचारांसाठीच्या आणि सेवांसाठीच्या उपकरणांमधले वैविध्यीकरण, आरोग्यक्षेत्रासाठीचे पुरक तंत्रज्ञान - निदान आणि औषधांची विशेष केंद्र, आणि आरोग्य सेवा व्यवस्थेत नव्या अभिनव तंत्रज्ञानाचा वापर  हेच आरोग्य सेवा क्षेत्राचे भविष्य आहे असे त्यांनी सांगितले.

भारतात येत्या नोंव्हेंबर महिन्यात भारतीय आरोग्यविषयक संवाद शिखर परिषद [India Health Dialogue Summit (IHD) - इंडिया हेल्थ डायलॉग समिट (आयएचडी)] आयोजित केली जाणार आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने, इथल्या आरोग्य सेवा उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील गुंतवणूक, जागतिक सहकार्य, अभिनवतेच्या संधी तसेच उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे.

भारतीय आरोग्यविषयक संवाद कार्यक्रमाअंतर्गतचा एक ठोस उपक्रम म्हणून इंडिया चेंबर्सने महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र अर्थात ग्लोबल मेड टेक झोन [Global Med Tech Zone (MGMTZ)] तयार केला जावा ही कल्पना मांडली आहे. इंडिया चेंबर आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भागिदारीत असे क्षेत्र विकसित करावे असा त्यांचा प्रस्ताव आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित सामान्य सुविधांसह (चाचणी, गुणवत्ता निर्धारण आणि गुणवत्ता नियंत्रण, निर्जंतुकीकरण, पॅकेजिंग/वेष्टण, उत्पादनांची आधुनिक पद्धतीने साठवण इ.) इतर तंत्रज्ञानाधारित उत्पादन निर्मिती असलेली परिसंस्था एकाच ठिकाणी उभी करावी हा त्यांचा उद्देश आहे. यासोबतच जागतिक मानकांनुसार निर्यात करता येतील अशा प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी उत्पादनप्रक्रियेत आधुनिकताधारीत क्षमतावृद्धी साधणे, आणि त्याद्वारे वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणांच्या उत्पादनांची क्षमता वाढवणे आणि यातून भारताच्या नेतृत्वातील जागतिक पुरवठा साखळी निर्माण करणे हा देखील हे केंद्र उभे करण्यामागचा महत्वाचा उद्देश आहे.

 

S.Patil/T.Pawar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945525) Visitor Counter : 126


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi