महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी त्यांच्या हस्ते उद्या गांधीनगर येथे जी 20 एम्पॉवर शिखर बैठकीचे उद्घाटन
संकल्पना : महिलांच्या नेतृत्वाखालील विकास: शाश्वत, सर्वसमावेशक आणि न्याय्य जागतिक आर्थिक वृद्धी सुनिश्चित करणे
Posted On:
31 JUL 2023 10:35AM by PIB Mumbai
गुजरातमध्ये गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे 1 ऑगस्ट 2023 रोजी जी 20 एम्पॉवर शिखर बैठक आयोजित करण्यात आली आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास: शाश्वत, सर्वसमावेशक आणि न्याय्य अशी जागतिक आर्थिक वृद्धी सुनिश्चित करणे या संकल्पनेतून आयोजित या शिखर बैठकीत अनेक जागतिक तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि हितसंबंधितांसह जी 20 राष्ट्रांमधील प्रतिनिधी, आमंत्रित अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचा सहभाग असेल.
महिलांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी जी 20 आघाडी असलेल्या एम्पॉवरसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय हे नोडल मंत्रालय आहे. शेर्पा ट्रॅक अंतर्गत हा खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील उपक्रम असून जी 20 देशांमध्ये खाजगी क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला आणि सक्षमीकरणाला गती देणे हा यामागचा उद्देश आहे.
एम्पॉवर घोषणापत्रामध्ये परावर्तित होणाऱ्या फलनिष्पत्तीसाठी, जी 20 एम्पॉवर अंतर्गत महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सक्रिय पाठिंब्याने भारतात फेब्रुवारी आणि एप्रिल 2023 मध्ये दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.आता 1-2 ऑगस्ट, 2023 रोजी गांधीनगर येथे शिखर बैठक होणार आहे. या बैठकांमधील विषयासंबंधी चर्चा आणि विचारविनिमय जी 20 एम्पॉवरच्या घोषणापत्रामध्ये प्रतिबिंबित होईल आणि हे जी 20 प्रमुखांना शिफारसी म्हणून प्रदान केल्या जातील.
केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटन सत्रात जी 20 एम्पॉवर अजेंडा अंतर्गत, या वर्षी जी 20 एम्पॉवर तंत्रज्ञान न्याय्य डिजिटल समावेशन मंच , सर्वोत्तम पद्धती पुस्तिका , केपीआय डॅशबोर्ड आणि जी 20 एम्पॉवर घोषणापत्र 2023 चा अवलंब यासह प्रमुख फलनिष्पत्ती उपक्रमांचा आरंभ देखील या बैठकीत होणार आहे.
याशिवाय,भारत सरकारचे महिला आणि बाल विकास आणि आयुष राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई ; जागतिक बँकेच्या उपाध्यक्ष लक्ष्मी श्याम सुंदर; संयुक्त राष्ट्र महिला विभागाच्या कार्यकारी संचालक सीमा बहौस यांच्यासह अनेक मान्यवर वक्ते उद्घाटन सत्राला संबोधित करतील.
जी 20 एम्पॉवरच्या अध्यक्ष डॉ संगीता रेड्डी भारताच्या अध्यक्षतेखाली एम्पॉवरचा प्रवास आणि त्यातून मिळालेले मूर्त परिणाम याविषयी सविस्तर माहिती देतील.
जी 20 एम्पॉवर शिखर बैठक ही हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असून जागतिक आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो तसेच अधिक समावेशक आणि न्याय्य जग निर्माण करण्यात सहाय्यकारी ठरेल.
***
JPS/SBC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944238)
Visitor Counter : 162