शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अखिल भारतीय शिक्षा समागम 2023 दरम्यान 106 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

Posted On: 30 JUL 2023 6:24PM by PIB Mumbai

 

अखिल भारतीय शिक्षा समागम 2023 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण आणि कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालयाने आज विविध प्रतिष्ठित संस्था आणि संघटनांसोबत 106 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारांमध्ये शिक्षण आणि उद्योग- शिक्षण संस्था संबंधांमध्ये सहकार्याच्या नवीन युगाची सुरुवात करून, अनेक कार्यक्षेत्रात नवोन्मेष, संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही संस्थांसोबतची भागीदारी समाविष्ट आहे.

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच नवउद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, अन्नपूर्णा देवी आणि राजकुमार रंजन सिंह यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्याच्या नेत्यांचे शैक्षणिक संगोपन करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल देशातील सध्याच्या शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील धुरिणांचे त्यांनी  कौतुक केले.

 

शालेय शिक्षण आणि साक्षरता:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत, कौशल्य विकास आणि शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध संस्था आणि क्षेत्र कौशल्य प्रदात्यांसोबत 15 सामंजस्य करार करण्यात आले. या भागीदारीमुळे कौशल्य मूल्यमापन आणि क्षमता वाढीलाही चालना मिळेल.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (NIOS) साठी, भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC) या संस्थेसोबत भारतीय सांकेतिक भाषेतील दर्जेदार शिक्षण संसाधनांच्या मानकीकरण आणि विकासासाठी कौशल्य तसेच संसाधने सामायिक करण्याच्या उद्देशाने भारतीय सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने eVidya उपक्रमा अंतर्गत दर्जेदार ई-सामग्रीच्या विकासासाठी आणि विविध भागधारकांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये PMeVIDYA DTH दूरचित्रवाहिनीद्वारे प्रसारित करण्यासाठी अनेक राज्यांच्या शालेय शिक्षण विभागांसह 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.

 

उच्च शिक्षण :

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात, भारतीय ज्ञान प्रणालीला चालना देण्यासाठी 6 सामंजस्य करार करण्यात आले. राष्ट्रीय तंत्रज्ञान शैक्षणिक मंच (NETF) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) अंतर्गत 14 सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सहकार्यांला  चालना देण्यासाठी, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)-मद्रास झांझिबार कॅम्पस सामंजस्य करारासह 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT तिरुपती आणि आयआयएफसीईटी यांच्यात देखील सामंजस्य करार करण्यात आले, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली

 

कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालय :

एकूण 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. हे सहकार्य करार, तरुणांना अत्याधुनिक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी तसेच भारतातील शैक्षणिक उत्कृष्टतेचे पालनपोषण करण्यासाठी सरकारच्या अटल वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. या भागीदारीच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी तसेच राष्ट्राचे उज्ज्वल - समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सर्व भागधारकांच्या सामूहिक प्रयत्नांची शिक्षण मंत्रालयाला अपेक्षा आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1944194) Visitor Counter : 185