आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दिल्ली येथे राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एम्सच्या केंद्रीय संस्था मंडळाची 7 वी बैठक आणि चिंतन शिबीर
उच्च अधिकारी आणि तज्ञांशी चर्चा करण्यासाठी चिंतन शिबीराने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ एम्स सारख्या प्रमुख आरोग्य संस्थांच्या चांगल्या पद्धती विकसित करण्यात मदत करेल: डॉ मांडविया
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशवासीयांना किफायतशीर आणि सुलभ आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध"
Posted On:
29 JUL 2023 8:57PM by PIB Mumbai
दिल्ली येथे राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेमध्ये आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील एम्सच्या केंद्रीय संस्था मंडळाच्या (सीआयबी ) 7 व्या बैठकीला आणि चिंतन शिबीराला संबोधित केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एस पी सिंह बघेल हे दोन्ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री उपस्थित होते.सीआयबी ही सर्व एम्सची ची वित्त, पायाभूत सुविधा, रिक्त जागा, भर्ती , धोरणांची अंमलबजावणी, आव्हाने आणि खरेदी यासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. या पूर्वीच्या सीआयबी बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या पूर्ततेचा आढावा घेणे हा आजच्या सीआयबी बैठकीचा अजेंडा होता.
उच्च अधिकारी आणि तज्ञांशी चर्चा करण्यासाठी चिंतन शिबीराने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ एम्स सारख्या प्रमुख आरोग्य संस्थांच्या चांगल्या पद्धती विकसित करण्यात मदत करेल , असे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशवासीयांना किफायतशीर आणि सुलभ आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. मला खात्री आहे की, या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आपल्याला सुविधांचा विस्तार करून एम्समधील व्यवस्था अधिक बळकट करता येईल ”, असे त्यांनी सांगितले.
या चिंतन शिबीरात विद्यमान महत्त्वाच्या मुद्द्यांवर सामूहिक आणि सुव्यवस्थितपणे लक्ष केंद्रित करण्यावर भर असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले.
"डॉक्टरांसाठी, उपचार हे यशाचा केवळ एक मापदंड आहे. मात्र लोकांचा त्यांच्याबद्दल दृष्टीकोन कसा आहे आणि समाजातील त्यांची भूमिका हे यशाचे अंतिम मूल्य आहे”असे प्रतिपादन डॉ.मांडविया यांनी केले. प्रत्येक देशवासीय एम्सकडे देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शास्त्र संस्था म्हणून पाहतो आणि सर्व मान्यवरांनी हा सन्मान जपला जाईल याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढच्या पिढीसाठी प्रगती आणि यशाचा वारसा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी एम्सच्या सर्व प्रतिनिधींना केले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944066)
Visitor Counter : 147