इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गांधीनगर येथे सेमीकॉनइंडिया 2023 प्रदर्शनाचे उद्या होणार उद्घाटन
आघाडीच्या 80 सेमीकंडक्टर कंपन्या 150 स्टॉल्सद्वारे त्यांच्या नवकल्पना प्रदर्शित करतील
Posted On:
24 JUL 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2023
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते उद्या गांधीनगर येथे ‘सेमिकॉन इंडिया 2023’ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या प्रदर्शनाद्वारे सेमिकॉन इंडिया 2023 च्या दुसर्या आवृत्तीचा प्रारंभ होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्योग आणि उद्योग संघटनांच्या सहकार्याने इंडिया सेमीकंडक्टर मिशनने याचे आयोजन केले आहे. 25 ते 30 जुलै दरम्यान होणारा हा कार्यक्रम इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या संकल्पनेला अनुरूप सेमीकंडक्टर रचना , निर्मिती आणि तंत्रज्ञान विकास यामध्ये जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताचा प्रवास उलगडून दाखवेल .
सेमिकॉन इंडिया 2023 मध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड मटेरियल्स सारख्या सेमीकंडक्टरमधील दिग्गजांचा प्रमुख सहभाग पहायला मिळेल, ज्यांनी अलीकडेच भारताच्या सेमीकंडक्टर व्यवस्थेत भरीव गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरात-स्थित सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्लांटमध्ये एकट्या मायक्रॉन टेक्नॉलॉजीची गुंतवणूक 825 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे तर अप्लाइड मटेरिअल्स त्यांच्या अभियांत्रिकी सहकार्य केंद्रासाठी 400 दशलक्ष डॉलर्स ची गुंतवणूक करणार आहे.
या प्रदर्शनात आघाडीच्या 80 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारे 150 स्टॉल्स त्यांचे अभिनव संशोधन आणि उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. या वैविध्यपूर्ण कंपन्या पुरवठा साखळी, जागतिक एकात्मिक उपकरण निर्माते आणि देशांतर्गत प्रमुख कंपन्यांसह सेमीकंडक्टर्सची संपूर्ण श्रेणी सादर करतील.
या कार्यक्रमात अभिनव संशोधनाबरोबरच 25 स्टार्टअप्सदेखील त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाची ओळख करून देतील आणि प्रमुख उद्योजकांशी संवाद साधतील.
सेमिकॉनइंडिया 2023 मध्ये 23 देश आणि विविध राज्यांचा सहभाग पहायला मिळेल ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील स्टॉल्स असतील, जे सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीच्या समर्थनार्थ राज्य सरकारांचे सामूहिक प्रयत्न प्रदर्शित करतील.
एससीएल, इसरो आणि स्पेस ऍप्लिकेशन सेंटर सारख्या संस्था देखील त्यांची कामगिरी प्रदर्शित करतील आणि आयआयटी बॉम्बे, आयआयटी मद्रास, बिट्स पिलानी, गणपत युनिव्हर्सिटी आणि निरमा युनिव्हर्सिटी सारख्या शैक्षणिक संस्था सक्रियपणे सहभागी होऊन भारताच्या सेमीकंडक्टर प्रगतीला चालना देण्यात शिक्षण क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतील.
सेमिकॉनइंडिया 2023 ही एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा दाखला आहे. भव्य प्रमाण आणि अभिनव संशोधनासह हे प्रदर्शन सेमीकंडक्टर उत्कृष्टतेसाठी उदयोन्मुख जागतिक केंद्र म्हणून भारताची क्षमता अभिमानाने जगासमोर मांडत आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1942281)
Visitor Counter : 116