संरक्षण मंत्रालय

दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या योगदानाचा इटलीने केला गौरव

Posted On: 22 JUL 2023 6:27PM by PIB Mumbai

 

भारतीय सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत इटलीमधील कम्युन ऑफ मोनोटोन आणि इटालियन लष्करी इतिहासकारांनी इटलीतील पेरुगियामधील मॉन्टोन येथे उभारण्यात आलेल्या व्ही.सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियल चे अनावरण केले. दुसऱ्या महायुद्धात इटालियन मोहिमेदरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच अप्पर टायबर व्हॅलीच्या पर्वत रांगांमध्ये लढताना शहीद झालेले व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते नायक यशवंत घाडगे यांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. इटलीतील भारताच्या राजदूत आणि भारतीय संरक्षण दलाशी संबंधित अधिकारी डॉ. नीना मल्होत्रा यांनी या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले. या कार्यक्रमाला इटालियन नागरिक, प्रतिष्ठित पाहुणे आणि इटालियन सशस्त्र दलाचे सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी इटालियन मोहिमेत मध्यवर्ती भूमिका बजावली होती. यामध्ये 4 थ्या, 8 व्या आणि 10 व्या विभागात 50,000 पेक्षा जास्त भारतीय सैनिकांचा सहभाग होता. इटलीमध्ये प्रदान करण्यात आलेल्या 20 व्हिक्टोरिया क्रॉस पदकांपैकी सहा पदके भारतीय सैनिकांनी जिंकली होती. या युध्दात 23,722 भारतीय सैनिकांना वीर मरण आले होते. यापैकी 5,782 भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले होते. संपूर्ण इटलीमध्ये पसरलेल्या 40 राष्ट्रकुल युद्ध स्मशानभूमींमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

हे स्मारक एक संयुक्त स्मारक बनवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, इटालियन मोहिमेत लढलेल्या भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणीतील सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या स्मारकावर भारतीय सैन्याचा फलक लावण्यात आला आहे.

हे स्मारक थेट सनडायलच्या स्वरूपात आहे. या स्मारकाचे ब्रीदवाक्य "ओमिन्स सब इओडेम सोल" असे असून ज्याचा अर्थ "आपण सर्व एकाच सूर्याच्या प्रकाशात राहतो" असा होतो.

इटालियन मोहिमेदरम्यानच्या योगदानाचा सन्मान करणाऱ्या या स्मारकाचे उद्घाटन म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील इटालियन मोहिमेदरम्यान भारतीय सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आणि योगदानाचा इटलीमध्ये परमोच्च आदर केला जातो, याची साक्ष आहे.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941768) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu