श्रम आणि रोजगार मंत्रालय
मध्यप्रदेशात इंदूर इथे, जी-20 रोजगार कार्यगटाच्या चौथ्या आणि श्रम तसेच मंत्र्यांची उद्यापासून तीन दिवसीय बैठक, मंत्रिस्तरीय जाहीरनामा आणि निष्कर्ष विषयक दस्तऐवजांना अंतिम स्वरूप देण्यावर भर
Posted On:
18 JUL 2023 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2023
रोजगार कार्यगटाच्या चौथ्या बैठकीत, मंत्रिस्तरीय जाहीरनामा आणि निष्कर्ष विषयक दस्तऐवजांना अंतिम स्वरूप देण्यावर भर दिला जाणार आहे. याच अनुषंगाने, आधीच्या तिन्ही बैठकांमधील निष्कर्ष, या बैठकीत एकत्रित करण्यात आले आहेत. रोजगार कार्यगटाच्या प्रतिनिधींच्या चर्चांची सांगता, जी-20 श्रम आणि मंत्रीस्तरीय बैठकीने होणार आहे. या बैठकीत, सर्व मुद्यांवर चर्चा होईल आणि निष्कर्ष स्वीकारले जातील, अशी माहिती, श्रम आणि रोजगार सचिव आरती आहुजा यांनी दिली. रोजगार कार्यगटाच्या चौथ्या बैठकीची माहिती देण्यासाठी इंदूर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि विविध देशांचे 24 मंत्री या बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी, जी-20 सदस्य आणि निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना जसे की, बीझनेस-20, लेबर-20, स्टार्ट अप-20, थिंक-20, आणि युथ-20 देखील सहभागी होतील.
कार्यगटाच्या या बैठकीत, भारताचे ई-श्रम पोर्टल सारखे अभिनव प्रयोग देखील दाखवले जातील, अशी माहीती आहुजा यांनी प्रसार माध्यमांना दिली.
या पोर्टलद्वारे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध आहे, जी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी पावले उचलण्यासाठी उपयुक्त ठरते.
तत्पूर्वी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सहसचिव रुपेश कुमार ठाकूर यांनी एका सादरीकरणाद्वारे माहिती दिली की, चौथ्या रोजगार कार्य गटाच्या बैठकीत 86 प्रतिनिधी सहभागी होत आहेत, तर 24 मंत्र्यांसह 165 प्रतिनिधी श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. आयएलओ, ओईसीडी आणि जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय संस्था आणि नियोक्ता संघटनांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान इंदूर आणि मध्य प्रदेशातील भव्य नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सौंदर्य दाखविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये प्रतिनिधींसाठी मांडू किल्ला आणि इंदूरमधील प्रसिद्ध खाऊ गल्ली छप्पन दुकनला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय इंदूर शहरातील महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी हेरिटेज वॉक आणि सायकल राईडचेही आयोजन करण्यात आले आहे. भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी पारंपरिक लोककला (संगीत आणि नृत्य) आणि हस्तकला देखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत इंदूरचे विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा म्हणाले की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दळणवळणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
S.Kane/R.Aghor/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940603)
Visitor Counter : 141