नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषद 2023 ची कर्टन रेझर’ या कार्यक्रमाची उद्या मुंबईत होणार सुरुवात
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय 17 ते 19 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषदे’च्या तिसऱ्या बैठकीचे यजमानपद भूषविणार
Posted On:
17 JUL 2023 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 17 जुलै 2023
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय प्रतिष्ठित ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषदे’च्या यावर्षी होत असलेल्या तिसऱ्या बैठकीचे यजमानपद भूषविणार आहे. 18 जुलै रोजी मुंबई येथील सेंट रेजीस येथे होणाऱ्या ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषद 2023’ च्या कर्टन रेझर अर्थात ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद यशो नाईक आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सागरी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णयकर्ते आणि प्रमुख उद्योजक यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच निर्माण करणे तसेच स्टार्ट अप उद्योग, संशोधक आणि चिंतनकर्त्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उभरत्या पद्धतींची ओळख करून घेण्याच्या संधी उपलब्ध करून देणे ही या ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषदे’ची उद्दिष्ट्ये आहेत. तसेच सागरी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे यश साजरे करणे तसेच उद्योगक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील परस्पर संवादातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा मंच उभारणे या हेतूने देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम सागरी क्षेत्रातील सरकारी अधिकारी, प्रभावी भागधारक, सुप्रसिध्द तज्ञ आणि द्रष्ट्या व्यक्ती यांना एकच मंचावर एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल.
‘जागतिक भारत सागरी शिखर परिषद 2023’ या परिषदेविषयी पूर्व ओळख करून देणारा हा कार्यक्रम भारताच्या सागरी क्षेत्राची ताकद अधोरेखित करेल आणि फलदायी सहयोगी संबंध तसेच गुंतवणुकीच्या नव्या संधी यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत मुख्य परिषदेची भव्यता आणि महत्त्व विषद करेल. कर्टन रेझर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहोळा झाल्यानंतर सागरी क्षेत्रातील उद्योग तसेच संघटना यांतील प्रभावी वक्ते या उद्योगाला आकार देणारे मौल्यवान विचार, दृष्टीकोन आणि कल यांच्या संदर्भात विचार मांडतील. या कार्यक्रमात मुंबई येथे असलेल्या विविध दुतावासांचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत.
या परिषदेविषयी पूर्व ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषद 2023’ विषयक अधिकृत माहितीपुस्तिकेचे अनावरण होणार आहे. परिषदेची ध्येयधोरणे, वक्ते, सादरकर्ते तसेच महत्त्वाचे उपक्रम यांचे एक व्यापक विहंगावलोकन सादर करणारी ही पुस्तिका परिषदेला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एक अत्यावश्यक मार्गदर्शक दस्तावेज म्हणून उपयुक्त ठरेल. या कर्टन रेझर कार्यक्रमामध्ये ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषदे’च्या समर्पित संकेतस्थळाची अधिकृत सुरुवात देखील होणार आहे. हे संकेतस्थळ परिषदेत भाग घेणाऱ्यांसाठी तसेच इतर भागधारकांसाठी एक मध्यवर्ती माहिती केंद्र म्हणून कार्य करेल आणि त्यांना महत्त्वाचे स्त्रोत आणि अद्यतने यांची माहिती मिळण्याची सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देईल.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने आयोजित केलेला हा परिषदेविषयी पूर्व ओळख करून देणारा कार्यक्रम मुख्य परिषदेची उत्सुकता वाढवणारा ठरेल आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे विचार प्राप्त करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या विविध अनावरणांचे साक्षीदार होण्याची एकमेव संधी उपलब्ध करून देईल.
यावर्षी 17 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत ‘जागतिक भारत सागरी शिखर परिषद 2023’ होणार असून त्यामध्ये जगभरातील 30 हून अधिक देश सहभागी होणार आहेत. विविध देशांच्या दरम्यान व्यापाराला प्रोत्साहन तसेच व्यापार करण्यातील सुलभता वाढवण्यासह गुंतवणुकीच्या नव्या संधी, माहिती तसेच तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील सहयोगी संबंध यांना चालना देणे यावर या परिषदेत अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल.
* * *
PIB Mumbai | jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940250)
Visitor Counter : 152