आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य मंत्रालयातर्फे आयोजित दोन दिवसीय स्वास्थ्य चिंतन शिबिराचा समारोप
Posted On:
15 JUL 2023 6:13PM by PIB Mumbai
आरोग्य मंत्रालयातर्फे देहरादून येथे आयोजित दोन दिवसीय स्वास्थ्य चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले, “आपल्या राज्यात परत गेल्यानंतर, या चिंतन शिबिरात शिकलेल्या गोष्टींचा उपयोग आपल्या धोरण निर्मिती मध्ये करूया. आयुष्मान भारत कार्ड आणि आयुष्मान भारत आरोग्य खाते ओळख क्रमांकाने देशाला जोडूया, आपल्या राज्यांना क्षयरोग मुक्त बनवूया आणि देशातून कुष्ठरोग, कालाझार आणि मलेरियाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करूया.”

या स्वास्थ्य चिंतन शिबिरामध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल, टी एस सिंग देव (उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री, छत्तीसगड), बीएस पंत (पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री, सिक्कीम), विश्वास सारंग (राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री, मध्य प्रदेश), आणि के लक्ष्मी नारायणन (सार्वजनिक बांधकाम मंत्री, पुद्दुचेरी) यांचा सहभाग होता.
विविध राज्यांचे आरोग्य मंत्री या शिबिराला उपस्थित होते. यामध्ये धनसिंग रावत (उत्तराखंड), रजनी विदादला (आंध्र प्रदेश), अलो लिबांग (अरुणाचल प्रदेश), केशब महंता (आसाम), ऋषिकेश पटेल (गुजरात), बन्ना गुप्ता (झारखंड), दिनेश गुंडू राव (कर्नाटक), सपम रंजन सिंग (मणिपूर), डॉ. आर. लालथ्यांगलियाना (मिझोरम), तिरू मा. सुब्रमण्यम (तामिळनाडू) यांचा समावेश होता.
या दोन दिवसीय संमेलनाला 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारांनी देशासाठी भविष्याचा वेध घेणारी आरोग्य विषयक धोरणे तयार करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी केले. त्यांनी राज्यांना आपले स्वतःचे चिंतन शिबीर आयोजित करायला प्रोत्साहन दिले. या ठिकाणी राज्यांच्या आरोग्य सेवेबाबतच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार स्थानिक पातळीवर उपाय शोधता येतील, असे ते म्हणाले. आरोग्यसेवा अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कल्पनांचा आरोग्य विषयक धोरण निर्मितीमध्ये समावेश करण्याची गरजही त्यांनी नमूद केली.
या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भारतातील सध्याच्या आरोग्यसेवेच्या विविध पैलूंवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाच्या सद्यस्थितीबरोबरच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान, जिल्हा निवासी कार्यक्रम आणि आयुष्मान भव कार्यक्रम यासारख्या विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
***
M.Pange/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939875)