संरक्षण मंत्रालय
बदलत्या भू-राजकीय स्थितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची निर्मिती झाली पाहिजे- सीडीएस अनिल चौहान यांचे डीआरडीओच्या संचालकांच्या परिषदेत प्रतिपादन
Posted On:
14 JUL 2023 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
आंतरराष्ट्रीय भू-राजकीय स्थिती अस्थिर आहे आणि या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देता येईल आणि संधींचा फायदा करून घेता येईल, अशा प्रकारे या बदलांना प्रतिसाद देणारे राष्ट्रीय धोरण असले पाहिजे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी सांगितले . ते आज 14 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित डीआरडीओच्या संचालकांच्या परिषदेत बोलत होते. उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी परफॉर्म(कामगिरी), रिफॉर्म(सुधारणा), ट्रान्स्फॉर्म(परिवर्तन), इन्फर्म(माहिती देणे) आणि कन्फर्म(पुष्टी करणे) या पंचसूत्रीवर भर दिला.
“‘थिएटरायजेशन’ मधून उदयाला येणारे तंत्रज्ञान” याचा संदर्भ देत ते म्हणाले की तंत्रज्ञान आणि डावपेच यामध्ये श्रेष्ठत्व असणे ही काळाची गरज आहे आणि भारतीय सशस्त्र दले युद्ध जिंकण्यासाठी नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहेत. संयुक्तपणा, एकात्मिकरण आणि थिएटरायजेशनची तत्वे अधोरेखित करताना जनरल अनिल चौहान म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात थिएटरायजेशन संकल्पना हा मूलभूत बदल विचाराधीन आहे.
सशस्त्र दलांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतेला एकात्मिक प्रकिया आणि संरचनांच्या माध्यमातून युद्ध लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी जोड मिळत असल्याने त्याचा परिणाम अनेक पटीने वाढवणे भौतिक क्षेत्रामध्ये एकात्मिकरणाचा उद्देश असतो, असे सीडीएस यांनी सांगितले.
डीआरडीओ चे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव डॉ. समीर कामत यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात युद्धाच्या बदलत्या स्वरुपाला आणि त्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित केले. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडियाच्या उद्दिष्टांना सुसंगत असलेल्या सुधारणा आणि रुपांतरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
जनरल चौहान यांनी उद्योगांना रचना, विकास आणि उत्पादन करण्यासाठी उपयुक्त असलेली डीआरडीओची आत्मनिर्भर भारतशी सुसंगत प्रणाली आणि उपप्रणालीची दुसरी यादी प्रकाशित केली.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939554)