वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इंग्लंडच्या व्यापार मंत्र्यांशी मुक्त व्यापार करार आणि व्यापार संबंधांवर केली चर्चा


लंडनमधील अनेक उच्चपदस्थ राजकारण्यांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशीही साधला संवाद

Posted On: 12 JUL 2023 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

 

भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 10 जुलै ते 12 जुलै या कालावधीत इंग्लंडची राजधानी लंडनला एक फलदायी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक उच्चपदस्थ राजकारणी, सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी संवाद साधला. भारत-इंग्लंड व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. चालू वाटाघाटींच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याशी ताळमेळ साधणारा हा दौरा धोरणात्मकदृष्ट्या योग्य वेळी आखला होता आणि संवादाला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

दौऱ्यादरम्यान गोयल यांनी इंग्लंडचे व्यापार मंत्री केमी बॅडेनोक यांची भेट घेतली. मुक्त व्यापार कराराविषयी चर्चा केली आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्याच्या अधिकाधिक संधी शोधण्याचा प्रयत्न केला.

भारताची 1.4 अब्ज लोकसंख्या आणि तिची उल्लेखनीय आर्थिक वाढ लक्षात घेऊन इंग्लंडसाठी भारतात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्याचे दोन्ही मंत्र्यांनी मान्य केले. विविध कठीण मुद्द्यांवर दोघांनी उत्साहात स्पष्ट आणि मुक्त चर्चा केली.

इंग्लंडच्या पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार डग्लस मॅकनील यांच्याशीही गोयल यांनी फलदायी चर्चा केली. या बैठकीत भारत आणि इंग्लंडच्या संबंधांना नवा आयाम देण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर भर देण्यात आला. दोन्ही पक्षांनी सहयोगी उपक्रमांद्वारे साध्य केलेल्या सकारात्मक परिणामांचे महत्त्व विचारात घेतले आणि भविष्यासाठी आशावाद व्यक्त केला. मॅकनील यांनी याआधी नवी दिल्लीचा दौरा करून वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

त्यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच भारत आणि इंग्लंडसाठी परस्पर हिताच्या विविध क्षेत्रातील भागधारकांचा समावेश असलेली गोलमेज परिषदही त्यांच्या भेटीदरम्यान भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यांनी भारत आणि इंग्लंडमधील उद्योगांना भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या यूके चॅप्टरच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.

 

 

 

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939095) Visitor Counter : 119


Read this release in: English , Urdu , Hindi