राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात अभ्यागत परिषदेचे 2023 चे उद्घाटन
भारताला ज्ञान महासत्तेत रूपांतरित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या नेत्यांची मोठी जबाबदारी आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपतींच्या हस्ते अभ्यागत पुरस्कार 2021 प्रदान
Posted On:
10 JUL 2023 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 जुलै 2023) राष्ट्रपती भवन येथे अभ्यागत परिषदेचे 2023 चे उद्घाटन केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, व्यक्ती, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. बहुतांश तरुणांसाठी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे उच्च शिक्षण असते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटातून येणाऱ्या तरुणांना न्याय्य आणि सर्वसमावेशक उच्च शिक्षण देणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ज्ञानाच्या बळावर देश जागतिक महासत्ता बनू शकतील. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे, हे ‘एनईपी’चे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, एनईपी नुसार, प्रभावी प्रशासन आणि नेतृत्व हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्ण संस्कृती निर्माण करण्यास सक्षम करते. सर्व जागतिक दर्जाच्या संस्थांचे एकसारखे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत स्वशासन आणि संस्थात्मक पदावर उत्कृष्ट गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या करणे, आहे.
ज्ञानाची केंद्रे ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेची केंद्रे बनावीत, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याची महत्वाकांक्षा घेऊन पुढे वाटचाल करावी. आपल्या तंत्रज्ञान संस्थांनी आता कृत्रिम बुद्धीमत्ता सारख्या क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज आहे, असं राष्ट्रपती पुढे म्हणाल्या.आयआयटी दिल्लीमधील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने शनिवारी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करुन, त्या म्हणाल्या की अशा दु:खद घटना इतर अनेक शैक्षणिक संस्थांमधे घडल्या आहेत. शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व लोकांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना संरक्षण देणे आणि त्यांच्यात निर्माण होणाका ताण, त्यांच्या संस्थांमधे होणारे अपमान किंवा दुर्लक्ष अशा घटनांमध्ये त्यांना आधार देणे, ही सर्व शिक्षणसंस्थांची जबाबदारी आहे. एक जबाबदार आणि संवेदनशील कुटुंबप्रमुख या नात्याने, सर्व संस्थाप्रमुख, शिक्षक आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजांबाबत संवेदनशील असायला हवे, असे त्या म्हणाल्या. “तुम्ही सगळे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहात, पालक आहात.” असे त्या म्हणाल्या. शिक्षणसंस्थांमधे विद्यार्थ्यांना घरच्याप्रमाणेच सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण मिळेल, असा सर्व संस्थाप्रमुखांचा असा प्रयत्न असायला हवा, असे त्यांनी सांगितले.
आपल्या मुलींना संधी मिळाली तर त्या, त्या संधीचे सोने करतात, असे नमूद करत तंत्रज्ञान संस्थांमधे मुलींचा सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या स्टेम मध्ये, मुलींचा सहभाग आणि त्यांची कामगिरी वाढवण्यासाठी, प्रोत्साहन द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या.
त्या आधी राष्ट्रपतींच्या हस्ते, अभ्यागत पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण हिंदीतून ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
S.Patil/S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938544)
Visitor Counter : 190