रसायन आणि खते मंत्रालय
मृदा आरोग्य आणि जमिनीच्या शाश्वत सुपिकतेसाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पोषकांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणासंदर्भात, डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांची कार्यशाळा
कृषी आणि मृदा उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही कृषी वैज्ञानिकांची जबाबदारी : डॉ. मनसुख मांडवीय
Posted On:
08 JUL 2023 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2023
“शेतामध्ये पोषक तत्वांचा गरजेपेक्षा अधिक आणि बेसुमार वापर केल्यामुळे, जमिनीची सुपिकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वच भागधारकांनी आणि सरकारने एकत्रित काम करुन, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज आहे.” असे मत, केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले. मृदा आरोग्य आणि जमिनीच्या शाश्वत सुपिकतेसाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पोषकांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणासंदर्भात, डॉ. मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांची आज कार्यशाळा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे, मनुष्य आणि इतर सजीवांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम डॉ मांडवीय यांनी यावेळी अधोरेखित केले. रासायनिक खतांचा बेसुमार वापर होणाऱ्या भागात आज वाढत्या आजारांचा सामना करावा लागतो आहे, असे त्यांनी सांगितले. “कृषी उत्पन्न वाढवणे ही आपली जबाबदारी आहे, मात्र त्याचवेळी, आपल्याला संपूर्ण कृषी व्यवस्था अशाप्रकारे मजबूत करायची आहे, जेणेकरुन, आपल्याला जमिनीच्या कसाबाबत तडजोड करावी लागणार नाही, तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही” असे डॉ. मांडवीय म्हणाले. याच संदर्भात, देशातील कृषी वैज्ञानिकांच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “वैज्ञानिक आणि त्यांनी देशाला दिलेले योगदान यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आता, कृषी तसेच मृदा उत्पादकता या दोन्ही क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना करत लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे ही वैज्ञानिकांची जबाबदारी आहे.त्याचवेळी, ह्या उपाययोजना अशा असायला हव्यात, की त्या शेतकऱ्यांना देखील सहज समजतील आणि त्यांनाच त्याची अंमलबजावणी करता येईल” अशी अपेक्षा मांडवीय यांनी व्यक्त केली.

नीती आयोगाचे सदस्य, प्रा. रमेश चंद म्हणाले, “रासायनिक खते वापरण्यास सुलभ आहेत. आणि म्हणूनच, लोक त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, या कार्यशाळेचा उपयोग आपण भारतात शेतीमध्ये, शाश्वत पद्धतींचा वापर वाढवण्यासाठीच्या चर्चेसाठी करणे महत्वाचे आहे.”
खते विभागाचे सचिव, रजत कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकारने कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्याचवेळी, जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा यांनी पीएम प्रणाम हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे नमूद केले. देशात खतांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे रासायनिक खतांमुळे होणारी हानी भरून काढू शकतील अशा शाश्वत कृषी पद्धतींची गरज आहे, असे आहुजा म्हणाले.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938158)