वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्लॅस्टिक क्षेत्राचे योगदान अतुलनीय आणि अमूल्य असेल - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री


"व्यवसायाच्या संधी, तरुण पिढीसाठी नोकऱ्या, जागतिक संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता प्लॅस्टिक क्षेत्रामध्ये आहे"

प्लॅस्टिक क्षेत्राने चक्राकार अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी, प्लॅस्टिकच्या कच्च्या मालाचा पुनर्वापरासाठी आणि प्लॅस्टिक कचऱ्याची अधिक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने विल्हेवाट लावण्यासाठी पाठबळ देण्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन

Posted On: 07 JUL 2023 5:55PM by PIB Mumbai

मुंबई, 7 जुलै 2023

 

देशांतर्गत प्लॅस्टिक क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत चांगली कामगिरी केली आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात  प्लॅस्टिक क्षेत्राचे योगदान अतुलनीय आणि अमूल्य असेल, असे ते म्हणाले. प्लॅस्टिक उद्योगाच्या वृद्धीसाठी मुंबईत आयोजित दुसऱ्या तंत्रज्ञान परिषदेत  दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते आज बोलत होते.

वर्ष 2020 पर्यंत देशाची निर्यात सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सपर्यंत स्थिर होती, मात्र  गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली आहे आणि देशाने निर्यात क्षेत्रात 776 दशलक्ष डॉलर्सचा  टप्पा गाठला आहे,असे  केंद्रीय मंत्री पीयूष  गोयल यांनी सांगितले. यात  प्लॅस्टिक उद्योगाचे योगदान 12  अब्ज डॉलर्सचे आहे  आणि त्यात वाढ होण्याची क्षमता आहे. या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी, तरुण पिढीसाठी नोकऱ्या, जागतिक संधी उपलब्ध करून देण्याची  क्षमता आहे आणि पुढील काही वर्षांत  प्लॅस्टिक क्षेत्राचे  संपूर्ण कार्यक्षेत्र  वाढवण्यास हे  सरकारला सहाय्यकारी ठरू शकते, असे  ते म्हणाले. नजीकच्या भविष्यात या उद्योगाच्या सुव्यवस्थित विकासासाठी सरकार या क्षेत्राच्या  सूचना ऐकण्यासाठी  सदैव तयार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्लॅस्टिक उद्योगाने मुक्त व्यापार कराराचा   विशेष  लाभ घ्यावा आणि त्यांनी आपली व्याप्ती विस्तारावी,  नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करावा आणि मोठ्या प्रमाणात  निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. यूएई आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आयात होण्याच्या  शक्यतेकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकार वस्तूंच्या  गुणवत्ता आणि उच्च दर्जासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्रात निकृष्ट उत्पादन स्वीकारार्ह नाही असे सांगत त्यांनी गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित केले.यामुळे   सरकार अधिक विश्वासार्ह आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादन बनवण्याच्या अनुषंगाने उद्योगांकडून सूचनांची वाट पाहत आहे आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करेल, असे गोयल यांनी  सांगितले.

   

गुणवत्तेसाठी जास्त खर्च येत नाही.  कमी खर्चातदेखील गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार होऊ शकते, हे उद्योगासाठी चांगले असून आपली  कार्यप्रणाली विस्तृत करण्यासाठी सहाय्य करण्यासह कचरा कमी करणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यास देखील मदत करणारे आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादन  देण्याची मानसिकता उद्योगाची असली पाहिजे असे सांगत उद्योगाच्या क्षमतेबाबत तसेच उद्योगांच्या समस्यांबाबत सरकार अत्यंत संवेदनशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

शाश्वतता आणि शाश्वत विकासासाठी एकत्रितपणे योगदान देण्याचे मार्ग ओळखण्याचे आणि ते मार्ग चक्राकार अर्थव्यवस्थेत कशाप्रकारे  योगदान देऊ शकतात यासाठीआणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी, प्लॅस्टिकच्या कच्च्या मालाचा पुनर्वापरासाठी आणि प्लॅस्टिक  कचऱ्याची अधिक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने विल्हेवाट लावण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पुनर्वापराच्या आघाडीवर बघितले तर भारत खूप पुढे आहे आणि भारताची पुनर्वापराची सरासरी 13 टक्के आहे, ही सरासरी 9 टक्के   जागतिक सरासरीच्या   आणि केवळ 4 टक्के सरासरी असणाऱ्या काही विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा खूप अधिक आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले. उदयोन्मुख काळ, उदयोन्मुख जग आणि जगाच्या गरजेनुसार नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञान तसेच भागधारकांच्या सहकार्याने या क्षेत्राला आकार देण्याचा सल्ला गोयल यांनी  उद्योगांना दिला. 

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937984) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi