निती आयोग
यशध्वनीच्या निनादात, स्टार्ट अप 20 गुरुग्राम शिखर परिषदेचा समारोप, भारताने ब्राझिलकडे सोपवली नेतृत्वाची मशाल
Posted On:
04 JUL 2023 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीअंतर्गत, स्टार्ट अप प्रतिबद्धता गटाने आयोजित केलेल्या स्टार्ट अप 20 शिखर परिषदेची आज हरियाणात गुरुग्राम इथे यशस्वी सांगता झाली. या दोन दिवसीय शिखर परिषदेमुळे, नवोन्मेषाला प्रोत्साहन, सहकार्य, ज्ञानाची देवघेव आणि जागतिक स्टार्ट अप व्यवस्थेत धोरणात्मक सहयोग अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच मिळाला.
परिषदेच्या सांगता समारंभात, स्टार्ट अप 20 चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांनी, ब्राझिल कडे स्टार्ट-अप 20 ची मशाल सुपूर्द केली. पुढच्या वर्षी जी-20 चे अध्यक्षपद भूषवणार असलेल्या ब्राझिल ने 2024 मध्येही स्टार्ट अप उपक्रम सुरू ठेवण्याविषयी काटिबद्धता यावेळी व्यक्त केली. स्टार्ट अप 20 च्या अध्यक्षपदाचे ब्राझिल सोबतचे सातत्य, ह्या गटाच्या महत्वाच्या उपलब्धीपैकी एक आहे, आणि जगभरात स्टार्ट अप व्यवस्थेच्या प्रगतीच्या मार्गातील हा एक मैलाचा दगड पार केला आहे, असे म्हणता येईल.
स्टार्टअप20 चे महत्त्व अधोरेखित करताना, सौदी अरेबियाचे प्रिन्स फहाद बिन मन्सूर यांनी त्यांच्या देशाच्या स्टार्ट अप गटाचे प्रतिनिधित्व केले होते. सौदी अरेबिया 2023 च्या अखेरपर्यंत स्टार्टअप व्यवस्थेत, वार्षिक 1 ट्रिलियन डॉलर्स इतका महत्त्वाकांक्षी निधी गुंतवण्याची घोषणा करत, स्टार्टअप 20 च्या आवाहनाला भक्कम प्रतिसाद आणि समर्थन देणारा पहिला देश ठरला आहे. प्रिन्स फहाद बिन मन्सूर यांनी आपल्या गुरुग्राम परिषदेतील भाषणात ही घोषणा करत, स्टार्ट अप व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. स्टार्ट अप मध्ये असलेली क्षमता ओळखून, जगाच्या कल्याणासाठी ह्या क्षेत्राचा एक शक्ती म्हणून वापर करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी डॉ. चिंतन वैष्णव यांनी ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे सांगत, त्याचे स्वागत केले. जागतिक नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यात, सौदी अरेबियाच्या भक्कम पाठबळाचीही त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी, डॉ. चिंतन यांनी धोरणात्मक आराखड्याचे औपचारीक प्रकाशन करतांना ह्या आराखड्यात अधोरेखित करण्यात आलेल्या काही विशिष्ट कृतीबिन्दुचे महत्त्व थोडक्यात सांगितले. ह्या धोरण आराखड्यातील महत्वाच्या मुद्यांमधे, स्टार्ट अपच्या व्याख्येची चौकट निर्माण आणि स्वीकृत करणे, सर्व जी 20 देशांमध्ये स्टार्टअप्सना आणि स्टार्ट अप व्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी एक संस्थात्मक जाळे उभारणे , भांडवल उपलब्धता आणि त्याचे वैविध्यीकरण वाढवणे, स्टार्टअप साठी बाजार नियमनात शिथिलता आणणे, कमी प्रतिनिधित्व असलेल्या वंचित समुदायांच्या समावेशाला प्राधान्य देणे, तसेच, जागतिक हिताच्या स्टार्ट अप्स आणि स्टार्ट अप व्यवस्थेत त्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे, अशा विषयांचा समावेश आहे. स्टार्ट अप व्यवस्थाना, प्रोत्साहन देऊन नवोन्मेष , विकास तसेच आणि जागतिक आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यास त्या सक्षम होतील, असे वातावरण निर्माण करणे हा या सगळ्या उपाययोजनांचा हेतू आहे.
ह्या धोरण आराखड्यामुळे, जी-20 देशांना प्रगती करू शकणाऱ्या स्टार्ट अप्सना पाठबळ देण्याचा, त्यांना सहकार्यातून निधी पुरवठा करणे, त्या त्या विषयानुरूप त्यांना आधार देणे, मार्गदर्शन करणे आणि जागतिक स्तरावर स्टार्ट अप व्यवस्था मोठी करण्यासाठी एक विशिष्ट दिशा मिळणार आहे.
ह्या परिषदेच्या समापनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937349)
Visitor Counter : 170