नौवहन मंत्रालय
दिब्रुगड मध्ये बोगीबील येथे 46.60 कोटी रुपये खर्चाच्या अंतर्देशीय जलमार्ग परिवहन टर्मिनलची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली पायाभरणी
Posted On:
04 JUL 2023 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज आसाममधील दिब्रुगड इथे, ब्रह्मपुत्रा (राष्ट्रीय जलमार्ग 2) नदीच्या किनाऱ्यावर, दिब्रुगढमधील बोगीबील येथे विकसित केल्या जाणाऱ्या अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक टर्मिनलची पायाभरणी केली. पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उभारल्या जाणाऱ्या या अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक टर्मिनलसाठी (आयडब्ल्यूटी) 46.60 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, हे टर्मिनल या प्रदेशात मालवाहू जहाजे आणि प्रवाशांच्या अंतर्देशीय जलमार्ग वाहतुकीला पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, ज्यामुळे व्यापारी आणि वाणिज्य उलाढाल वाढण्यासाठी मार्ग मोकळा होईल.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “महाबाहू ब्रह्मपुत्रेच्या अफाट क्षमतेचा आपण आदर आणि सन्मान केला पाहिजे, आणि कोणतीही पर्यावरणीय किंवा आर्थिक हानी होऊ न देता, यापुढील कार्यक्षम विकास आणि प्रगतीसाठी शक्य असलेल्या सर्व मार्गांनी त्यांचा वापर करायला हवा. अंतर्देशीय जलमार्गांचे केंद्र म्हणून दिब्रुगडची भूतकाळातील ऐतिहासिक भूमिका लक्षात घेता, आगामी काळात बोगीबील इथले हे आधुनिक टर्मिनल एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून दिब्रुगडचे हरवलेले वैभव परत मिळवून देईल, आणि लगतच्या आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या विकासाचे माध्यम म्हणून उदयाला येईल, असा मला विश्वास आहे.”
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937322)
Visitor Counter : 123