अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर विभागाने पकडलेल्या परदेशी नागरिकाने शरीरात दडवल्या अंमली आणि गुंगी आणणाऱ्या पदार्थांच्या कॅप्सूल्स
Posted On:
30 JUN 2023 8:51PM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर विभागाच्या मुंबई विभागातील अधिकार्यांनी, दिनांक 21 जून 2023 रोजी, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बेनिन नागरीकाला पकडले. त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, ज्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि त्याच्या शरीरातून काही प्रतिबंधित वस्तू असल्यास ती वसूल करण्याचे आदेश दिले. त्याच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याने अंमली पदार्थांच्या अंदाजे 43 कॅप्सूल गिळून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. योग्य उपचारानंतर, 21.06.2023 ते 30.06.2023 या रुग्णालयातील 10 दिवसांच्या वास्तव्यादरम्यान या परदेशी नागरीकाच्या शरीरातून एकूण 43 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.त्या कॅप्सूल मधील पदार्थांची तपासणी केल्यानंतर तो पदार्थ हेरॉईन असल्याचे आढळले. एकूण 504 ग्रॅम वजनाचा हलका तपकिरी चिकट पदार्थ (ज्याची बाजारभावात 5 कोटी रुपये किंमत ) काढण्यात आला असून अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अंतर्गत (NDPS) तो जप्त करण्यात आला आहे.
आरोपीने अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्याला अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरीरात अंमली पदार्थ लपवणे(बॉडी पॅकिंग) हा अवैधरीत्या अंमली पदार्थांची वाहतूक करण्याचा एक सर्वसाधारण मार्ग आहे. ड्रग पेडलर सामान्यतः गुदद्वारात (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट) किंवा शरीरातील इतर भागात अंमली पदार्थ गिळून ठेवतात किंवा लपवतात. पॅकेजिंगचे सतत सुधारणारे तंत्र आणि तस्करांकडून वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिकतेमुळे अशा औषधांची पाकिटे शोधणे कठीण झाले आहे. निदानाला होणारा विलंब आणि अयोग्य कृती बॉडी पॅकर्ससाठी घातक ठरु शकतात आणि काही वेळा ते बॉडी पॅकर्ससाठी मृत्यूला कारणीभूत होऊ शकतात.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
स्रोत: DRI MZU
***
Radhika A/ Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936600)
Visitor Counter : 108