ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी ग्राहक हिताला हानी पोहोचविणाऱ्या 'डार्क पॅटर्न्स म्हणजे फसवणूक करणाऱ्या पद्धतींपासून दूर राहण्याचे ग्राहक व्यवहार विभागाचे आवाहन


असे डार्क पॅटर्न्स, विशिष्टरित्या तयार केलेले प्रारूप वापरून ग्राहकांना त्यांच्या  हिताचे नसलेले पर्याय निवडण्यास भाग पाडून ग्राहकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालतात

Posted On: 30 JUN 2023 5:26PM by PIB Mumbai

 

ग्राहकांच्या पसंतीबाबत फसवणूक किंवा फेरफार करू शकणाऱ्या आणि 'डार्क पॅटर्न्स' (वेबसाईट्स किंवा ऍप्सवर ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी योजलेल्या फसव्या पद्धती ) वर्गवारीत मोडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या प्रारूपांचा सामावेसह आपल्या मंचाच्या आंतरपृष्ठावर करू नये, असे आवाहन केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ऑनलाईन मंचांना  केले आहे.

यासंदर्भत ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी देशातील  प्रमुख ऑनलाइन मंचांना उद्देशून पत्र लिहिले आहे. ऑनलाईन मंचांनी ग्राहकांच्या पसंतीत फेरफार करण्यासाठी आपल्या ऑनलाईन आंतरपृष्ठावर डार्क पॅटर्न्स समाविष्ट करून अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब करू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 2(9) अंतर्गत समाविष्ट ग्राहक हक्कांचे  उल्लंघन करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

डिझाईन आणि पर्याय प्रारूपाचा  वापर करून फसवणूक करणे, जबरदस्ती करणे किंवा ग्राहकांना त्यांच्या सर्वोत्तम हिताच्या नसलेल्या निवडी करण्यासाठी प्रभावित करणे, डार्क पॅटर्न्समध्ये  समाविष्ट आहे. ऑनलाइन आंतरपृष्ठावर डार्क पॅटर्न्सचा  वापर करणाऱ्या  फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या  पद्धती अन्यायकारक शोषण करून ग्राहकहिताला हानी पोहोचवतात आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत 'अयोग्य व्यापार प्रथा' ठरतात.

अलीकडल्या काळात यूरोपीय संघअमेरिका आणि इंग्लंडसारखी अधिकारक्षेत्र असणाऱ्या  नियामकांनी ऑनलाइन आंतरपृष्ठावर ग्राहकांसाठी हानिकारक आढळलेल्या, अयोग्य आणि फसव्या पद्धतींचा समावेश असलेल्या डार्क पॅटर्न्सविरोधात कारवाई केली आहे.  या मंचांवर आढळलेल्या गतिविधी पुढीलप्रमाणे :

i सहमतीविनाच सबस्क्रिप्शन (सदस्यता) प्रोग्राममध्ये नोंदणी (अमेरिका.)

ii दिशाभूल करणारे काउंटडाउन घड्याळ वापरून विक्रीचा दबाव (इंग्लंड)

iii गुप्तपणे क्रेडिट कार्ड माहिती जतन करणे आणि संमतीशिवाय वापरकर्त्यांना शुल्क आकारणे (अमेरिका)

iv सदस्यत्व बंद करण्याच्या निवडीपासून ग्राहकांना परावृत्त करण्यासाठी आखलेली प्रक्रिया(नॉर्वे).

5.फसवणुकीच्या पद्धती म्हणजेच डार्क पॅटर्नस् ची काही उदाहरणे खालीलप्रमाणे सांगता येतील:

 i खोटी घाई/टंचाई दाखवणे: ही युक्ती ग्राहकांना खरेदी करावी किंवा एखादी कृती करावी यासाठी दबाव आणत तातडीची किंवा टंचाईची भावना निर्माण करते.

 ii बास्केट स्नीकिंग: वापरकर्त्याच्या संमतीशिवाय शॉपिंग कार्टमध्ये अतिरिक्त उत्पादने किंवा सेवा जोडण्यासाठी वेबसाइट्स किंवा ॲप्स डार्क पॅटर्नचा वापर करतात.

 iii सबस्क्रिप्शन ट्रॅप्स (सबस्क्राईब करण्यासाठीचे सापळे): ही युक्ती ग्राहकांना एखाद्या सेवेसाठी साइन अप करणे सोपे करते परंतु अनेकदा ही सेवा रद्द करण्याचा पर्याय लपवून किंवा सेवा रद्द करण्यासाठी अनेक क्लिष्ट टप्प्यांची सक्ती करुन सेवा रद्द करणे मात्र कठीण बनवते,

 iv. ग्राहकांमध्ये अपराधीपणाचा भाव निर्माण करणे: ग्राहकांना जखडून ठेवण्याचा एक मार्ग म्हणून अपराधीपणाच्या भावनेचा वापर केला जातो. विशिष्ट विश्वास किंवा दृष्टिकोनाचे समर्थन न केल्यामुळे ग्राहकांवर टीका किंवा त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला जातो.

 v. कृती करण्याची अप्रत्यक्ष सक्ती: यात ग्राहकांना ते करु इच्छित नाहीत अशी एखादी कारवाई करण्यास भाग पाडले जाते. जसे की, एखाद्या आशयामध्ये प्रवेश करण्यासाठी सेवेमध्ये साइन अप करणे.

 vi नॅगिंग: यात एखादी कृती करण्यासाठी सतत, पुन्हा पुन्हा आणि त्रासदायकरित्या टीका, तक्रारी, किंवा विनंती केली जाते.

 vii इंटरफेस इंटरफेअरन्स: या युक्तीमध्ये ग्राहकांना सदस्यता/किंवा ऑर्डर रद्द करणे किंवा खाते हटवणे यासारख्या काही कृती करणे कठीण बनवले जाते.

 viii. आमिष आणि बदल: यामध्ये एका उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात केली जाते, परंतु वितरण मात्र दुसर्‍याच आणि बऱ्याचदा कमी दर्जाच्या उत्पादनाचे केले जाते.

 ix छुप्या किमती: या युक्तीमध्ये ग्राहक खरेदी करण्यासाठी वचनबद्ध होईपर्यंत, अतिरिक्त खर्च लपवले जातात.

 x प्रच्छन्न (फसव्या) जाहिराती: प्रच्छन्न जाहिराती या अशा प्रकारच्या जाहिराती असतात ज्या इतर प्रकारच्या सामग्रीसारख्या दिसण्यासाठी डिझाइन केल्या जातात.

6. भारतातील इंटरनेटचा वाढता प्रवेश आणि स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे ग्राहक अधिकाधिक ई-कॉमर्सला खरेदीला प्राधान्यक्रम म्हणून निवडत आहेत. अशा परिस्थितीत, ग्राहकांवर होणारे हानिकारक किंवा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म डार्क पॅटर्नस् चे नमुने समाविष्ट करून अनुचित व्यापार पद्धतींमध्ये गुंतलेले नसणे आवश्यक असते.

7. ग्राहक अशा डार्क पॅटर्सची उदाहरणे नोंदवू शकतात किंवा फीडबॅक देऊ शकतात आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर ‘1915’ वर फोन करून किंवा 8800001915 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाइन पद्धतींविरोधात तक्रार नोंदवू शकतात.

***

R.Aghor/S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936489) Visitor Counter : 130


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia