संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशाच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेसह शांततेचा ध्वज-वाहक म्हणून कार्य करणाऱ्या बळकट आणि स्वावलंबी भारताची सरकार उभारणी करत आहे : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे डेहराडून येथे प्रतिपादन

Posted On: 19 JUN 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2023

 

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सशक्तीकरण घडताना दिसत असून  2047 पर्यंत  विकसित राष्ट्र होण्यासाठीचा पाया घातला जात आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे आज 19 जून 2023 रोजी आयोजित केलेल्या   ‘स्वर्णिम भविष्य’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत उचललेल्या पावलांमुळे देशाचा समग्र विकास, सामाजिक एकसंधपणा यांची सुनिश्चिती झाली असून या काळात जनता  देशातील समृद्ध सांस्कृतिक वारशाशी पुन्हा नव्याने जोडली गेली आहे असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की आपला देश महिलांच्या दृष्टीने  संपूर्णपणे सुरक्षित करण्याबरोबरच  महिलांना मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

लष्करी आणि संरक्षणविषयक दृष्टीकोनातून भारताचे स्वर्णिम भविष्य घडवण्यासाठीच्या आराखड्याची माहिती देताना केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणाले की संरक्षण क्षेत्रात संपूर्ण स्वावलंबी असलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तसेच तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा भारताची निर्मिती करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. देशातील युवकांना संरक्षण क्षेत्रातील संशोधक होऊन मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा असल्यास त्यांना त्यासाठी भरपूर संधी उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

“आपण देशात नव्या आयआयटी तसेच एनआयटी संस्था स्थापन केल्या असून शिक्षण संस्थांतील जागांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच,या क्षेत्रातील  स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संरक्षण विषयक उत्कृष्टते साठी नवोन्मेष (आयडीईएक्स) उपक्रम आणि तंत्रज्ञान विकास निधी (टीडीएफ)यांच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रासाठी नव्या संकल्पना देखील आमंत्रित केल्या आहेत.  हे सर्व उपक्रम आणि इतर अनेक सुधारणा यांच्यामुळे भारत लवकरच संरक्षण सामग्रीच्या आयातदार या भूमिकेकडून आघाडीचा संरक्षण सामग्रीचा  निर्यातदार  देश म्हणून स्थापित होईल. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेल्या आणि प्रादेशिक तसेच जागतिक  शांतीचा ध्वज-वाहक म्हणून कार्य करणाऱ्या  बळकट आणि स्वावलंबी भारताची उभारणी करण्याचे काम आपण करत आहोत,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

जागतिक पटलावरील निव्वळ निरीक्षणकर्ता या भारताच्या प्रतिमेत परिवर्तन करत  आता  एक ठाम आश्वासक देश अशी प्रतिमा केल्याबद्दल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933524) Visitor Counter : 113