पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पृथ्वीला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवण्यासाठी पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारण्याचे अश्विनी कुमार चौबे यांचे आवाहन

Posted On: 17 JUN 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आज बिहारमधील बक्सर येथे पाणथळ जागा वाचवण्याचा भाग म्हणून मिशन लाईफ (LiFE) वर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  हा कार्यक्रम 08 जून 2023 रोजी बक्सरच्या गोकुळ जलाशय येथे आयोजित केलेल्या ‘पाणथळ जागा वाचवा’ या मोहिमेचाच पुढला भाग आहे. हा कार्यक्रम मंत्रालयाच्या ADRI, पाटणा येथील पर्यावरण माहिती, जागरूकता, क्षमता निर्माण आणि उपजीविका कार्यक्रम केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला होता.

लाईफेथॉन - LiFEathon रन ने  कार्यक्रमाची सुरुवात झाली. पर्यावरण, वने आणि हवामान राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, या रन सह दिवसभरातील कार्यक्रमात सहभागी झाले.  त्यानंतर त्यांनी LiFE वरील प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच 12, 7 आणि 5 किलोमीटर स्पर्धेतील मुला-मुलींमधील LiFEathon विजेत्यांचा सत्कार केला. मंत्रालयाचे सहसचिव डॉ. सुजित कुमार बाजपेयी,  राज्य पाणथळ जागा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुरेंद्र सिंग, बिहार SPCB चे सदस्य सचिव  चंद्रशेखर राव आणि  राजकुमार एम. तसेच  भोजपूरचे डीएफओ सुद्धा यावेळी उपस्थित होते.

   

बिहारच्या विविध भागांतील सुमारे 550 मुला-मुलींनी LiFEathon रनसाठी नोंदणी केली होती. मिशन LiFE आणि पाणथळ क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून पर्यावरण जागरूकता तसेच संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या अनोख्या कार्यक्रमाची यशस्वीपणे सांगता झाली. LiFE संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात आसाम, बिहार, झारखंड, सिक्कीम, उत्तराखंड आणि दिल्ली या सहा राज्यांमधील EIACP केंद्रांनीही सहभाग घेतला. मंत्रालयाच्या हरित कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत (GSDP) विकसित केलेली उत्पादने त्यांनी प्रदर्शित केली.  या व्यतिरिक्त ZSI, BSPCB, BIS, बिहार जीविका आणि भोजपूर वनविभागाने देखील त्यांचे स्टॉल लावले.  प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर, चौबे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मिशन लाइफवर प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल सहभागींचे कौतुक केले. प्रदर्शनात उपस्थितांना आणि अभ्यागतांना नाविन्यपूर्ण वस्तू, बांबूच्या हस्तनिर्मित कलाकृती, बांबूपासून बनवलेल्या पाण्याच्या बाटल्या इत्यादी पर्यावरणस्नेही उत्पादने पाहण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळाली.

   

या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नुक्कड नाटकाने आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या पथनाट्याच्या माध्यमातून पाणथळ प्रदेशांचे महत्त्व आणि त्यांचे संरक्षण आणि जतन करण्याची तातडीची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना चौबे म्हणाले की पाणथळ जागा या अनेक कारणांनी महत्त्वाच्या असतात. पाणथळ जमिनींचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व सांगून त्यांनी या पाणथळ जागा वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले. चक्रीवादळांची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच 10 वर्षांपूर्वी याच दिवशी केदारनाथ दुर्घटनेने आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसह अनेक लोकांचे प्राण गमावले होते, याची आठवण करून दिली आणि त्या दुर्दैवी घटनेत आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या कुटुंबांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

प्रकृती आणि प्रगती हातात हात घालून चालली पाहिजे आणि अशा आपत्तींपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात, असेही चौबे यांनी स्पष्ट केले. लाईफेथॉन (LiFEathon) साठी भल्या पहाटे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बक्सरच्या तरुणांचे चौबे यांनी कौतुक केले आणि त्यांनी या तरुणांना ‘पर्यावरण प्रहरी’ म्हणून संबोधित केले. लाईफेथॉन (LiFEathon) कार्यक्रमात तरुण मुलींच्या इतक्या मोठ्या सहभागाबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला, तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की या उपक्रमात सहभागी तरुण बक्सरच्या इतर नागरिकांना देखील लाईफ (LiFE) अभियान आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी जागरूक करतील.

   

सहसचिव डॉ. सुजित कुमार बाजपेयी, यांनी बीज भाषण केले. त्यांनी पाणथळ जागा, एनपीसीए (NPCA) योजना आणि अमृत धरोहर कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाजपेयींनी सांगितले केले की बिहारमध्ये अनेक पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसर स्थळे म्हणून निवड केले जाण्याची क्षमता आहे. राज्य पाणथळ जागा वाचवा मोहिमेतून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंत्रालय या प्रस्तावावर त्वरीत विचार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

   

लाईफ (LiFE) या पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीवर आधारित न्याहारीच्या अनुभवाचा एक भाग म्हणून, सहभागींना सेंद्रिय आणि शाश्वत अन्न पर्याय प्रदान केले गेले, जे पर्यावरणास अनुकूल आहारातील निवडी, शाश्वत अन्न पर्याय आणि जबाबदार वापराचे फायदे दर्शवितात. यावेळी  अश्विनी कुमार चौबे यांनी उपस्थितांना लाईफ( LiFE) जीवनशैली संबंधित प्रतिज्ञा दिली आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. 

   

 

* * *

M.Pange/Vinayak/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933091) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu