शिक्षण मंत्रालय
पुणे -जी 20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करणार
19 जून, 2023 पासून आयोजित बैठकीत '‘विशेषत: मिश्र शिक्षणासंदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याविषयक ज्ञान सुनिश्चित करणे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन
Posted On:
16 JUN 2023 7:40PM by PIB Mumbai
पुणे येथे जी -20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी शिक्षण मंत्रालय सज्ज होत आहे. हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम 20 - 21 जून 2023 या कालावधीत होणार आहे आणि G-20 सदस्य देश, अतिथी देश आणि ओईसीडी , युनेस्को आणि युनिसेफ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील 85 प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
युनिसेफ, ओईसीडी आणि युनेस्कोच्या वरिष्ठ प्रतिनिधीं व्यतिरिक्त, 15 देशांतील मंत्र्यांनी 22 जून 2023 रोजी होणाऱ्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे कळवले आहे. या बैठकीच्या निमित्ताने उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुण्यात जी -20 शिक्षण कार्यगटाची चौथी बैठक , मंत्रिस्तरीय बैठक, जन भागिदारी कार्यक्रम आणि जी -20 बैठकीनिमित्त आयोजित अन्य कार्यक्रमांची माहिती दिली.
के. संजय मूर्ती यांनी IISER, पुणे आणि ELSEVIER च्या सहकार्याने आयोजित 'सुगम्य विज्ञान : सहकार्याला चालना ' या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख केला. "जी 20 राष्ट्रांच्या अनुषंगाने विकासासाठी संशोधन सहकार्याची स्थिती आणि प्रासंगिकता" या शीर्षकाचा अहवाल शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी आयआयएसईआर, पुणे येथे आज प्रसिद्ध केला असून भारताच्या संशोधन सहकार्य आणि वाढीबद्दल वैज्ञानिक समुदायात आवश्यक समज त्यात निहित असल्याची माहिती त्यांनी दिली.
जी 20 शिक्षण कार्यगटाच्या मुख्य बैठकीपूर्वी एक परिसंवाद आणि प्रदर्शन होईल. 19 जून 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुनिश्चित करणे, " या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांसारख्या मान्यवर वक्त्यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. प्रा. मंजुल भार्गव मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन ) या विषयावर सादरीकरण करतील. परिसंवादात तीन चर्चासत्र देखील असतील, ती खालीलप्रमाणे आहेत:
i) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी मिश्र पद्धतीद्वारे शिकण्याचे दृष्टीकोन आणि अध्यापनशास्त्र शिक्षण
ii) महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (गृह शिक्षण ), सामाजिक-भावनिक कौशल्ये तसेच मुलांचे आरोग्य आणि पोषण यासाठी पालक, काळजीवाहक आणि समुदाय सदस्यांची भूमिका.
iii) सीबीएसईच्या अध्यक्ष निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण’.
चर्चासत्रांमध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात , इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका , चीन, युके आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना आणि युनिसेफ सारख्या बहुस्तरीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल.
शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करणारे मल्टीमीडिया प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नॅशनल बुक ट्रस्ट ट्रस्ट, भारतीय ज्ञान प्रणाली विभाग (आयकेएस ) आणि स्टार्टअप उपक्रमांसह 100 हून अधिक प्रदर्शक त्यांचे योगदान या प्रदर्शनात सादर करतील. या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 जून 2023 रोजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन 19 जून वगळता 17 ते 22 जून 2023 या कालावधीत स्थानिक संस्था, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी खुले असेल.
जनभागीदारी कार्यक्रमासह अनेक कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद आणि परिषदांसह अनेक उपक्रम 1 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली. लोकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य, जिल्हा, गट, पंचायत, शालेय आणि उच्च शिक्षण स्तरावर हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. जी 20 च्या चौथ्या शैक्षणिक कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे उपक्रम राबवले जात आहेत. जन भागीदारी कार्यक्रमांचे नेतृत्व केंद्रीय विद्यालये, उच्च शिक्षण संस्था, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तसेच जवाहर नवोदय विद्यालयांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहे. आत्तापर्यंत एकूण 4 कोटी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवला आहे. हा सहभाग अभूतपूर्व आहेच पण लोकांना वाटत असलेला रस आणि त्यांच्या उत्साहाचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठात 17 ते 18 जून दरम्यान मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र - ‘ आजीवन अध्यनासाठी पाया निर्मिती’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाईल. ही परिषद विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुलभ करणारे वातावरण तयार करण्यासाठी राज्ये स्वीकारत असलेल्या सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी मदत करेल, असे त्यांनी पुढे सांगितले. यात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण विभाग, केंद्र सरकारचे ज्ञान भागीदार, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) आणि युनिसेफ तसेच नागरी समाज संस्था यांचा सहभाग असेल.
जी 20 प्रतिनिधी सांस्कृतिक कार्यक्रमात आणि रात्रीच्या भोजनाचाही आस्वाद घेतील. या कार्यक्रमात पुण्यातील सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध पाककला यांचे दर्शन घडेल. याव्यतिरिक्त, पुणे शहराचा हेरिटेज वॉक आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यासारख्या सहलींमुळे सहभागींना पुण्याचा समृद्ध वारसा आणि परंपरा अनुभवण्याची संधी मिळेल. 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोपानंतर सर्व शिक्षण मंत्री शनिवार वाडा पहायला जाणार आहेत.
***
S.Kakade/S.Kane/S.Chavan/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932987)
Visitor Counter : 260