संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कट्टुपल्ली येथील एल अँड टी कंपनीच्या परिसरात सर्वेक्षण जहाज (विशाल) प्रकल्पातील ‘संशोधक’ या चौथ्या जहाजाचे आज 13 जून 2023 रोजी जलावतरण झाले

Posted On: 13 JUN 2023 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2023

सर्वेक्षण जहाज (विशाल) (एसव्हीएल) प्रकल्प या एल अँड टी/ जीआरएसई यांच्यातर्फे बांधणी करण्यात येत असलेल्या चार सर्वेक्षण जहाज(विशाल) बांधणी प्रकल्पामधील ‘संशोधक’ या चौथ्या जहाजाचे आज, 13 जून 2023 रोजी चेन्नईतील कट्टुपल्ली येथे जलावतरण करण्यात आले. या जलावतरण सोहोळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे मुख्य हायड्रोग्राफर व्हाईस अॅडमिरल अधीर अरोरा उपस्थित होते. नौदलाची सागरी परंपरा जपत, त्यांच्या पत्नी तन्वी अरोरा यांनी अथर्ववेदामधील मंत्रोच्चारांच्या घोषामध्ये या जहाजाचे जलावतरण केले. सदर प्रकल्पातील जहाजांच्या सर्वेक्षण करणारे किंवा नव्या गोष्टी शोधणारे जहाज या प्राथमिक भूमिकेचे निदर्शक म्हणून या जहाजाला ‘संशोधक’ म्हणजे ‘संशोधन करणारे, अन्वेषण करणारे जहाज’ असे नाव देण्यात आले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि कोलकाता येथील गार्डन रीच जहाजबांधणी आणि अभियंते (जीआरएसई) यांच्या दरम्यान 30 ऑक्टोबर 2018 रोजी या चार एसव्हीएल जहाजांच्या बांधणीसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.जहाज बांधणी धोरणानुसार, या प्रकल्पातील पहिले जहाज कोलकाता येथील जीआरएसई कंपनीच्या परिसरात आणि उर्वरित तीन जहाजांच्या उभारणी कामाचे उप-कंत्राट कट्टुपल्ली येथील एल अँड टी जहाजबांधणी कंपनीला देण्यात आले होते.या प्रकल्पातील संधायक, निर्देशक आणि ईक्षक या पहिली तीन जहाजांचे जलावतरण अनुक्रमे 05 डिसेंबर 2021, 26 मे 2022 आणि 26 नोव्हेंबर 2022 या दिवशी करण्यात आले होते.

सध्या सेवेत असलेल्या संधायक श्रेणीतील सर्वेक्षण जहाजांच्या  ऐवजी आता एसव्हीएल जहाजे तैनात करण्यात येणार आहेत. या नव्या जहाजांमध्ये सागरशास्त्रीय माहिती गोळा करण्यासाठी अत्याधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. ही एसव्हीएल प्रकारची जहाजे 110 मीटर लांब, 16 मीटर रुंद आणि 3400 टन वजनाची आहेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीतर्फे निर्मित स्वदेशी पद्धतीने विकसित डीएमआर 249-ए या प्रकारच्या पोलादापासून या जहाजांचा मुख्य भाग तयार केला आहे.

बंदरे आणि दिशादर्शक मार्गांजवळच्या संपूर्ण किनारपट्टीचे आणि खोल पाण्यातील सागरशास्त्रीय सर्वेक्षणाचे काम करणे ही या चार सर्वेक्षण मोटर बोटी आणि एक अखंड हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता असलेल्या जहाजांची मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर संरक्षण संबंधी कारवाया तसेच नागरी उपयोगासाठी आवश्यक असलेली सागरशास्त्रीय आणि भूभौतिक माहिती गोळा करण्याचे कार्य देखील या जहाजांवर सोपवण्यात येणार आहे. तसेच दुय्यम भूमिकेत, ही जहाजे मर्यादित स्वरुपात संरक्षणविषयक मोहिमा, मानवतावादी मदत आणि आपत्कालीन मदत यासंदर्भात कार्य करण्यास सक्षम असून आपत्ती काळात रुग्णालय जहाजे म्हणून देखील ही जहाजे सेवा देऊ शकतील.

या सर्वेक्षण जहाजांच्या बांधणीमध्ये 80% स्वदेशी बनावटीच्या  सामग्रीचा वापर करण्यात आला असून त्यामुळे भारतीय उत्पादन उद्योगांतर्फे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाची सुनिश्चिती झाली आहे. त्याचसोबत, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती  आणि भारतामध्येच युध्दनौकांची बांधणी करण्याच्या क्षमतेत वाढ होईल. चौथ्या  एसव्हीएल जहाजाच्या जलावतरणामुळे आपल्या सरकारच्या  ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारताच्या’ संकल्पनेचा  भाग म्हणून स्वदेशी बनावटीच्या जहाजबांधणीच्या आपण केलेल्या निश्चयाला अधिक बळ मिळाले आहे.

 

 S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1932115) Visitor Counter : 218


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil