विशेष सेवा आणि लेख

भारताच्या G20 अध्यक्षतेखालील एसएआय-20 परिषदेचे गोव्यामध्ये आयोजन


नील अर्थव्यवस्था आणि एसएआय दरम्यान सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी जबाबदार लेखापरीक्षण संस्थांच्या भूमिकेवर भर

एसएआय-20 गट प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सज्ज : गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई

नील अर्थव्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्यामध्ये सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची आणि सुशासन आणि उत्तरदायित्व यामध्ये जबाबदार लेखापरीक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) गिरीश चंद्र मुर्मू यांचे मत

प्रशासनात मजबुती आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी एसएआय-20 गटाची स्थापना करण्यात आल्याचे जी -20 शेर्पा अमिताभ कांत यांचे प्रतिपादन

Posted On: 12 JUN 2023 5:47PM by PIB Mumbai

पणजी, 12 जून 2023

भारताच्या G20 अध्यक्षतेखालील SAI 20, अर्थात सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था-20 परिषद आज गोव्यामध्ये सुरू झाली. सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था -20 (SAI 20) प्रतिबद्धता गटाचे अध्यक्ष, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) गिरीश चंद्र मुर्मू यांनी या चर्चा सत्राचे नेतृत्व केले.

नील अर्थव्यवस्थेच्या लेखापरीक्षणात सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असून, जबाबदार लेखापरीक्षण संस्थांनी, आपल्या कामात सुशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करून, संपूर्ण  मानवजातीवर आपला जास्तीतजास्त सकारात्मक प्रभाव पडायला हवा, असे गिरीश चंद्र मुर्मू यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, नील अर्थव्यवस्थेचे लेखापरीक्षण आणि जबाबदार लेखापरीक्षण संस्था यांचे काम आव्हानात्मक असले तरी, नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराचे सर्वव्यापी स्वरूप लक्षात घेता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकासासाठी सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांमध्ये (SAI) घनिष्ठ सहकार्य आवश्यक आहे.

शाश्वतता, विकास आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका यांचे महत्त्व ओळखून ते म्हणाले की, लेखापरीक्षण संस्था -20 (SAI 20) प्राधान्य क्षेत्र - "नील अर्थव्यवस्था" आणि "जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन युगातील संधी आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करतात, आणि ते खऱ्या सहकार्याची गरज अधोरेखित करतात. कॅगने माहिती दिली की जागतिक स्तरावरील अनुभव आणि उपक्रम समजून घेण्याच्या दृष्टीने आणि बाह्य भागधारक या क्षेत्रातील लेखापरीक्षणाच्या नव्या भूमिकेकडे कसे पाहतात हे जाणून घेण्याच्या दृष्टीने, त्यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील या विषयाच्या तज्ञांशी संवाद साधला, आणि गेल्या काही महिन्यांमध्ये या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रे आयोजित केली.

नील अर्थव्यवस्थेच्या प्राधान्य क्षेत्राचे महत्व स्पष्ट करताना कॅगने सांगितले की, नील अर्थव्यवस्थेला जसे महत्व मिळत आहे, तसे त्याच्या लेखापरीक्षणालाही महत्व प्राप्त झाले आहे. ही प्रगती पुढे नेण्यासाठी, एसएआय-20 समुदायाने नवीन तंत्रज्ञान, कौशल्य, क्षमता आणि पद्धती आत्मसात करण्यासाठी सहकार्याला प्राधान्य द्यायला हवे, आणि या सहकार्याला अनुकूल ठरतील असे मार्ग आणि व्यासपीठ सक्रीयपणे निर्माण करायला हवेत. 

कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापराची क्षमता आणि धोके यांची चर्चा करताना, या तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा जबाबदारीने वापर करण्यासाठी  धोरणकर्त्यांनी योग्य प्रकारे प्रक्रिया हाताळणे आवश्यक आहे या मुद्द्यावर कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांनी  अधिक भर दिला. कृत्रिम तंत्रज्ञान प्रशासनामध्ये अधिकाधिक प्रमाणात वापरले जाऊ लागले असल्यामुळे एसएआयने या तंत्रज्ञानावर आधारित सरकारी यंत्रणांचे  लेखापरीक्षण  करण्याच्या दृष्टीने स्वतःला सुसज्ज केले पाहिजे तसेच एसएआयच्या कार्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यांच्या लेखापरीक्षण तंत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्याच्या संधींचा शोध घेतला पाहिजे यावर देखील त्यांनी अधिक भर दिला.

एसएआय इंडियाच्या पर्यावरणीय लेखापरीक्षण आणि शाश्वत विकास यासाठीच्या आंतराराष्ट्रीय केंद्रामध्ये (आयसीईडी) आयएनटीओएसएआय साठीच्या जागतिक प्रशिक्षण सुविधा असलेल्या नील अर्थव्यवस्थेसाठीच्या उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेची घोषणा करताना गिरीशचंद्र मुर्मू म्हणाले की, यासाठीची प्रक्रिया एप्रिल 2023 मध्ये सुरु झाली असून त्यावेळी 7 एसएआयकडून आलेल्या 32 प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये नील अर्थव्यवस्थेच्या लेखपरीक्षणाशी संबंधित समस्यांविषयीचे त्यांचे अनुभव सामायिक केले होते. या क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासोबतच या महत्त्वाच्या क्षेत्रातील माहितीचे सामायीकीकरण तसेच क्षमता निर्मिती यासाठी प्रेरक शक्ती म्हणून काम करणारी एक  संस्था असावी या संकल्पनेतून  या उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक मुर्मू म्हणाले की विविध प्रमुख लेखापरीक्षण संस्था तसेच नीलअर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या चर्चासत्रात उपस्थित तज्ञ या सर्वांचा मोठा पाठींबा तसेच योगदानाचा परिणाम म्हणून नील अर्थव्यवस्था आणि जबाबदार कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान यांच्यावर आधारित दोन संकलने तयार होऊ शकली.

जी-20 समूहाचे शेर्पा अमिताभ कांत त्यांच्या भाषणात म्हणाले की, एसएआय20 ची स्थापना हे अत्यंत सकारात्मक पाऊल असून त्यातून एसएआय आणि सरकार यांना परस्परांशी समन्वय साधण्यासाठीचे जाळे निर्माण करण्यात यश आले आहे. तसेच  यामुळे एसएआयएस ना सरकारचे भागीदार म्हणून काम करण्याची आणि कार्यात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात मदत करण्याशी संधी मिळाली आहे असे ते म्हणाले..

जी-20 समूहाच्या अधिपत्याखाली काम करणारा एसएआय20 गट प्रशासनाचे बळकटीकरण करण्यात आणि नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्यात मध्यवर्ती भूमिका निभावेल अशी अपेक्षा आहे यावर  गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई  यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात अधिक भर दिला. एसएआयएसच्या भूमिकेवर भर देतानाच राज्यपाल म्हणाले की संबंधित देशातील  एसएआयत्यांच्या प्रशासनातील जबाबदारी, परिणामकारकता आणि एकात्मतेची सुनिश्चिती यासाठीचे आधारस्तंभ आहेत.

एसएआय20 चे सदस्य,एसएआय ला उपस्थित पाहुणे,एसएआय ला निमंत्रित सदस्य, आंतरराष्ट्रीय संस्था आणि प्रतिबद्धता गट यांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी  एसएआय20 शिखर परिषद आणि नील अर्थव्यवस्था,जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्राधान्य क्षेत्रांबद्दल त्यांचे विचार त्यांच्या भाषणांमधून  मांडले. शिष्टमंडळांनी एसएआय20 प्रतिबद्धता गट मंच यशस्वीपणे पुढे नेण्याच्या  एसएआय   इंडियाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.या वक्त्यांनी   एसएआयच्या सदस्यांना दोन प्राधान्य क्षेत्रांबद्दल त्यांचे ज्ञान आणि अनुभव सामायिक करण्याची संधी प्रदान करताना प्राधान्य क्षेत्रांच्या मजबूत प्रासंगिकतेवर सहमती दर्शवली. या प्रतिनिधींनी  एसएआय  इंडियाच्या अध्यक्षपदी असलेल्या  एसएआय20 बैठकांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या फलदायीतेचेही कौतुक केले.

या बैठकीदरम्यान,तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी नाविन्यपूर्ण , उपयुक्त माहिती  प्रदान केली. या तज्ज्ञांनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंबद्दल त्यांचे मौल्यवान ज्ञान आणि अनुभव यावेळी सामायिक केले.

एसएआय20 च्या  शिखर परिषदेत जी20 सदस्यएसएआय मधील ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कोरिया, इंडोनेशिया, भारत, रशिया, सौदी अरेबिया आणि तुर्किये इत्यादी राष्ट्रांसह  सुमारे 85 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग होता.एसएआय  च्या पाहुण्या राष्ट्रांमध्ये  बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, स्पेन आणि यूएई या राष्ट्रांचा समावेश होता. एसएआय च्या  निमंत्रित राष्ट्रांमध्ये  मोरोक्को आणि पोलंड या राष्ट्रांचा समावेश होता.आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये  अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्था आणि जागतिक बँक यांचा तर  प्रतिबद्धता गटांमध्ये  थिंक20 आणि यूथ20 सारख्या गटांचा समावेश होता.

 

 S.Bedekar/Rajashree/Sanjana/Gajendra/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1931721) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil