रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 752 ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण दरम्यानच्या 51 वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी

Posted On: 11 JUN 2023 7:50PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 752 ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण  दरम्यानच्या 51 वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची, आमदार  संदिपान भुमरे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह पाहणी केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले की छत्रपती संभाजी नगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात सध्याच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला 50 ते 100 वर्षे जुनी 51 वटवृक्षे होती.  ही जुनी महाकाय झाडे तोडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण करणे शक्‍य नव्हते. पण ती न तोडता अन्य ठिकाणी पुनर्रोपण करून पुनर्जीवित करण्याचा विचार केल्याचे त्यांनी सांगितले.  जायकवाडी धरणामुळे भूजल पातळी चांगली असल्याने यासाठी पैठण देवभूमीची निवड करण्यात आल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वृक्ष पुनर्रोपणाचा हा देशातील पहिला आणि एकमेव उपक्रम आहे, ज्यामध्ये 51 झाडांचे पुनर्संचयन आणि पुनर्रोपण यशस्वीरित्या करण्यात आले आहे.  ही झाडे आगामी काळात प्रतिकूल हवामान बदलाची परिस्थिती आणि नैसर्गिक घटनांचे परिणाम परतवून लावतील आणि भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण, वन्यजीव अधिवास सुधारण्यासाठी आणि मातीची धूप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पर्यावरण सुधारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गडकरी यांनी सांगितले.  नव्याने बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंच्या क्षेत्रफळानुसार मोठी झाडे लावण्याचा सरकारचा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.  हरित महामार्गाची निर्मिती भारताला स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ही मंत्री महोदयांनी नमूद केले.

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931537) Visitor Counter : 210
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu