कंपनी व्यवहार मंत्रालय
आयआयसीए आणि नलसर विद्यापीठाने "नादारी आणि दिवाळखोरी कायद्यात एलएल. एम अभ्यासक्रम केला सुरू
Posted On:
08 JUN 2023 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2023
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) ने हैदराबाद येथील नलसर कायदे विद्यापीठाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे नादारी आणि दिवाळखोरी कायद्यांमध्ये एलएल. एम हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे.
भारतातील अशा प्रकारच्या पहिल्याच अभ्यासक्रमाचा शुभारंभ भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज गोविल यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार, कुलगुरू प्रा. श्रीकृष्ण देवाराव, नलसर कायदे विद्यापीठाच्या निबंधक प्रा. के. विदुल्लथा रेड्डी, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सच्या कॉर्पोरेट लॉ स्कूलचे प्रमुख डॉ. पायला नारायण राव तसेच दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक आणि कर्मचारी सदस्य उपस्थित होते.
नलसर कायदे विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या सहकार्याने या अभिनव अभ्यासक्रमाची संकल्पना मांडल्याबद्दल मनोज गोविल यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स संस्थेची प्रशंसा केली. ते या कार्यक्रमाला संबोधित करत होते. नादारी आणि दिवाळखोरी कायदा संदर्भात सर्वोत्तम आणि दर्जेदार व्यावसायिक, कायदेविषयक शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि संशोधक तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे गोविल यांनी सांगितले. हे व्यावसायिक, कायदेविषयक शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि संशोधक अत्यंत आत्मविश्वासाने हा व्यवसाय स्वीकारू शकतील आणि देशातील समृद्ध दिवाळखोरी परिसंस्थेत सामील होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात सर्व प्रकारच्या दिवाळखोरीचा समावेश आहे ज्यामध्ये नादारी आणि दिवाळखोरी तसेच संबंधित कायदे समाविष्ट आहेत, अशी माहिती गोविल यांनी या अभ्यासक्रमाच्या व्याप्ती बाबत बोलताना दिली.
हा दोन वर्षांचा पूर्णवेळ एलएल. एम पदवी निवासी अभ्यासक्रम असून तो 51 क्रेडिट्ससह चार सत्रामध्ये विभाजित केला आहे. हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स आणि नलसर या दोन संकुलांमध्ये समान प्रमाणात विभागलेला आहे. प्रत्येक सत्रा दरम्यान विविध शैक्षणिक क्रियाकलापामध्ये किमान 24 आठवडे अध्यापन, संशोधन, व्यावहारिक अभिहस्तांकन, विहित केलेल्या विषयांवर वर्गात आणि वर्गाबाहेर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यशाळा आणि सादरीकरणे यांचा समावेश आहे. याशिवाय, उद्योगासमुहात चार विशिष्ट कालावधींच्या अनिवार्य प्रशिक्षणाचाही समावेश असेल.
सुरुवातीला प्रत्येक तुकडीसाठी एकूण 60 जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया 8 जून 2023 पासून सुरू होईल आणि 31 जुलै 2023 रोजी संपेल. या अभ्यासक्रमाचे वर्ग 5 ऑक्टोबर, 2023 पासून नलसर कॅम्पसमध्ये सुरू होतील. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड CLAT स्कोअर आणि लेखी परीक्षेसह मुलाखत प्रक्रियेद्वारे केली जाईल. प्रत्येक स्ट्रीम प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांचे योगदान देईल. विद्यार्थी 31 जुलै 2023 पर्यंत www.nalsar.ac.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930829)
Visitor Counter : 180