ऊर्जा मंत्रालय
उदंचन तत्त्वावर आधारित जलविद्युत प्रकल्प आणि इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोत प्रकल्पांसाठी राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाचा (एनएचपीसी) महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागासोबत सोबत सामंजस्य करार
या प्रकल्पाच्या माध्यमातून 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार आणि राज्यातील 7,000 लोकांसाठी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगार निर्मिती : मुख्य व्यवस्थापकीय संचालक, एनएचपीसी
Posted On:
07 JUN 2023 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2023
उदंचन तत्त्वावर आधारित जलविद्युत प्रकल्प आणि इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोत प्रकल्प विकसित करण्यासाठी राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ (एनएचपीसी) आणि महाराष्ट्र सरकारचा ऊर्जा विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या सामंजस्य करारानुसार, एकूण 7,350 मेगावॅट क्षमतेचे चार उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यात येतील. यात काळू - 1,150 मेगावॅट, सावित्री - 2,250 मेगावॅट, जालोंद - 2,400 मेगावॅट आणि केंगाडी - 1,550 मेगावॅट या ठिकांणांचा समावेश आहे. या करारांतर्गत राज्यात इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोत प्रकल्पही विकसित केले जातील.
2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे म्हणचे ऊर्जा संक्रमणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यात सहाय्य करण्यासाठी ऊर्जा संचय उपाय म्हणून उदंचन जलविद्युत प्रकल्पांचा उपयोग या सामंजस्य करारामध्ये समाविष्ट आहे
एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. विश्नोई यांनी राज्यातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी एनएचपीसीवर विश्वास दाखवल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यात एनएचपीसीसाठी हे एक सुरुवातीचे पाऊल आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि राज्यातील 7,000 लोकांना अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारावर एनएचपीसी (प्रकल्प) संचालक विश्वजित बसू आणि महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी स्वाक्षरी केली. एनएचपीसीचे स्वतंत्र संचालक उदय एस निरगुडकर; एनएचपीसीचे कार्यकारी संचालक (एसबीडी आणि सी) रजत गुप्ता आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एनएचपीसी लिमिटेड हा भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, आणि भारतातील सर्वात मोठी जलविद्युत विकास संस्था आहे, यामध्ये जलविद्युत प्रकल्पांच्या संकल्पनेपासून ते कार्यान्वित करण्यापर्यंतचे सर्व उपक्रम हाती घेण्याची क्षमता आहे. एनएचपीसीने सौर आणि पवन ऊर्जा विकासाच्या क्षेत्रातही वैविध्य आणले आहे. भारतात आणि परदेशात पारंपरिक आणि अपारंपरिक स्त्रोतांद्वारे ऊर्जेच्या सर्व पैलूंमध्ये एकात्मिक आणि कार्यक्षम विकासाचे नियोजन, प्रोत्साहन आणि आयोजन करणे कंपनीला बंधनकारक आहे. 2009 मध्ये यशस्वीरित्या आयपीओ काढल्यानंतर एनएचपीसी ही एनएससी आणि बीएसईवरील सूचीबद्ध कंपनी आहे.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930435)
Visitor Counter : 227