संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गांधीजींच्या सत्याग्रहाच्या 130 व्या वर्षपूर्ती निमित्त दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात भारतीय नौदल होणार सहभागी

Posted On: 06 JUN 2023 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2023

दक्षिण आफ्रिकेतील डरबनजवळील पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर वर्णभेदाविरुद्ध संघर्ष सुरू झाल्याच्या घटनेला 130 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय नौदल सहभागी होणार आहे. आयएनएस त्रिशूल ही भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका 6 ते 9 जून 23 या कालावधीत डरबनला भेट देणार आहे. 7 जून 1893 रोजी पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानक  येथील घटनेच्या 130 व्या स्मरण दिनानिमित्त तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या पुनर्स्थापनेला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आयएनएस त्रिशूल डरबनला भेट देत आहे.

महात्मा गांधी 1893 साली व्यापारी दादा अब्दुल्ला यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे दाखल झाले होते. 07 जून 1893 रोजी ट्रान्सवालमधील प्रिटोरियाच्या प्रवासादरम्यान ते प्रथम पीटरमारिट्झबर्ग स्थानकावर आले होते. रितसर तिकीट खरेदी करून प्रथम श्रेणीच्या डब्यात बसलेल्या गांधीजींना एका युरोपियन माणसाच्या तक्रारीवरून त्या डब्यातून बाहेर काढण्यात आले. कारण युरोपियन लोकांच्या म्हणण्यानुसार प्रथम श्रेणीच्या डब्यात ‘कुली’ आणि अश्वेत लोकांना प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. हीच घटना गांधीजींच्या वांशिक भेदाविरुद्धच्या लढ्याला आणि पर्यायाने सत्याग्रहाला  कारणीभूत ठरली असे मानले जाते.

25 एप्रिल 1997 रोजी पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावरील महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या प्रेरक कथेला आणखी एक जीवन प्राप्त झाले, जेंव्हा दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या अध्यक्षतेखाली पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर एका उत्साही समारंभात, पीटरमॅरिट्झबर्गचे स्वातंत्र्य गांधींजीना मरणोत्तर समर्पित करण्यात आले. राष्ट्रपती मंडेला यांनी "दडपशाहीचा सामना करताना वैयक्तिक त्याग आणि समर्पणाचे गांधीजीं हे उत्कृष्ट उदाहरण आहे", असे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी शतकानुशतकापासून केली जात असलेली जुनी चूक सुधारण्यासाठी एकत्र जमलेल्यांना संबोधित करताना सांगितले.

आयएनएस त्रिशूलच्या डरबन भेटीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आकार देणारे यासारखे महत्त्वपूर्ण क्षण भारतीय नौदल साजरे करत आहे. डर्बनच्या भेटीदरम्यान ही नौका पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमात भाग घेईल तसेच नौकेवरील अधिकारी गांधीजी चबूतऱ्यावर पुष्पांजली अर्पण करतील. यावेळी भारतीय नौदलाचा बॅन्ड खास सुरावटी सादर करेल. या भेटीदरम्यान ही नौका इतर व्यावसायिक आणि सामाजिक कार्यातही सहभागी होणार आहे.

 

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1930304) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil