आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताची जी20 अध्यक्षताः आरोग्य कार्य गटाची तिसरी बैठक
जी20 आरोग्य कार्य गटाच्या तीन दिवसांच्या तिसऱ्या बैठकीचा झाला समारोप
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2023 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
“जागतिक संशोधन आणि विकास नेटवर्क सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे असे भविष्य निर्माण करू शकतो जिथे कोणीही मागे राहणार नाही आणि जीवरक्षक वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपचारांची उपलब्धता हे एक सार्वत्रिक सत्य असेल, असे प्रतिपादन औषधनिर्माण विभागाच्या सचिव एस अपर्णा यांनी केले आहे. जी20 आरोग्य कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीचा आज हैदराबाद इथे समारोप झाला. या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.

समारोप सत्रामध्ये बोलताना एस अपर्णा यांनी जी20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी महामारी सज्जता आणि प्रतिसादाला पाठबळ देण्यासाठी जागतिक वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना मंचांतर्गत जागतिक संशोधन आणि विकास जाळे स्थापन करण्याबाबत दिलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल त्यांची प्रशंसा केली. या बैठकीमध्ये झालेल्या विचारमंथनामुळे आम्हाला सहकार्यात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यासाठी मदत झाली आहे आणि जागतिक संशोधन आणि विकास जाळ्याचे प्रारुप मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीमुळे जगभरातील आरोग्य प्रणालींवर पडलेल्या प्रभावाविषयी बोलताना केंद्रीय औषधनिर्माण सचिव म्हणाल्या की जागतिक संशोधन आणि विकास जाळ्याच्या माध्यमातून विविध देश, संस्था आणि हितधारकांमध्ये सहकार्य निर्माण करण्याची वेळ आता आली आहे, जे नवोन्मेषाला प्रोत्साहन देईल आणि संशोधनाला गती देईल. भविष्यात निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक आकस्मिक स्थितीचे भाकित करण्याची, सज्जतेची आणि अतिशय खंबीरपणे, समानतेने आणि वेळेवर प्रतिसाद देण्याची जागतिक पातळीवर आवश्यक असलेली चपळाई आणि अतिरिक्त सामर्थ्य निर्माण करण्यासाठी हा एक अत्यावश्यक घटक असेल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसात झालेल्या विचारमंथनातून अशा प्रकारचे सक्रीय जाळे निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत सिद्धांत प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. संबंधित भागीदारांच्या क्षमतेत वाढ करणे, ज्ञानाची संरचनात्मक देवाणघेवाण, प्राधान्यक्रमांची निश्चिती, संसाधनांचे वाटप, क्षमता उभारणी आणि तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण हे महत्त्वाचे पैलू अतिशय उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या जागतिक संशोधन आणि विकास जाळ्याचे अत्यावश्यक स्तंभ आहेत, हे या बैठकीत लक्षात घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जैवविज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यांसाठी हैदराबाद येथे उभारलेल्या भारतातील पहिला संघटीत समूह म्हणून विकसित जीनोम व्हॅलीला भेट देण्यासाठी जी-20 प्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आला होता. संशोधन आणि नवोन्मेष विषयाशी संबंधित अनेक संस्था हे जीनोम व्हॅलीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. जी-20 प्रतिनिधींनी या दौऱ्यात, जैववैद्यकीय संशोधनासाठी स्थापित भारत बायोटेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधा (एनएआरएफबीआर) तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सुविधांची फणी केली. या सुविधांना दिलेल्या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी कोवॅक्सीन या भारतात स्वदेशी पद्धतीने विकसित कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या शोधाची सखोल माहिती घेतली. भारत बायोटेक इंटरनॅशनल या कंपनीने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्था (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने भारतात ही लस विकसित केली. जीनोम व्हॅलीमध्ये असलेल्या विविध संस्थांतील सुविधांना भेटी देण्यासाठी जी-20 प्रतिनिधींना नेण्यात आले. या प्रतिनिधींनी सुविधांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे दृष्टीकोन मांडले तसेच शंका निरसन केले.

यावेळी वैद्य राजेश कोटेचा यांनी समग्र एमसीएम मंचाला मदत करण्यासाठी अनुवादात्मक संशोधनाच्या गरजेवर भर दिला.त्यांनी पारंपरिक औषध क्षेत्रातील नव्या मार्गांचा शोध, किफायतशीर, सुरक्षित आणि समग्र आरोग्यसुविधांची सुनिश्चिती करण्याच्या दिशेने बहुशाखीय दृष्टीकोनाशी सहयोग आणि त्याचा स्वीकार यांची जोपासना यांचे महत्त्व अधिक ठळकपणे विषद केले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल, डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीजचे अध्यक्ष सतीश रेड्डी, झायडस लाईफ सायन्सेसचे प्रमुख पंकज पटेल, जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संघटना, मंच आणि जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, डब्ल्यूईएफ इत्यादी भागीदार यांचे प्रतिनिधी यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी या भेटीच्या वेळी उपस्थित होते.
S.Kane/ Shailesh/Sanjana/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1930297)
आगंतुक पटल : 233