युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
वाराणसी येथील खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 चा समारोप
69 पदकांची कमाई करणाऱ्या पंजाब विद्यापीठाने पटकावले विजेतेपद
“उत्तर प्रदेशाकडून आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे आयोजन”- अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
03 JUN 2023 9:40PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशात भारताच्या आध्यात्मिक राजधानी वाराणसी येथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी( आयआयटी)- बनारस हिंदू विद्यापीठाच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 चा आज एका साध्या आणि नेटक्या सोहळ्याने समारोप झाला.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी ओदिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचे स्मरण करण्यात आले. काल झालेल्या या दुर्घटनेत मरण पावलेल्यांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठ योगासनांचे सादरीकरण करण्यात आले.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 2022, यूपी ही स्पर्धा सर्वोच्च शैक्षणिक स्तरावरील भारताच्या सर्वात मोठ्या बहुक्रीडा कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती होती आणि 12 दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये 200 पेक्षा जास्त विद्यापीठांचे 4000 पेक्षा जास्त खेळाडू 21 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धांच्या समारोपाच्या दिवशी चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला 26 सुवर्ण, 17 रौप्य आणि 26 कांस्य पदकांसह विजेते घोषित करण्यात आले. यामुळे पंजाब विद्यापीठाला ओदिशा येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतले विजेतेपद पुन्हा परत मिळवता आले जे त्यांनी दुसऱ्या आवृत्तीमध्ये जैन विद्यापीठाकडून पराभूत झाल्यामुळे गमावले होते. अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाने दुसरा क्रमांक(24 सुवर्ण, 27 रौप्य, 17 कांस्य) पटकावला तर कर्नाटकच्या जैन विद्यापीठाने( 16 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य) तिसरा क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात या विद्यापीठांना ही पदके प्रदान करण्यात आली.
अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “सर्वप्रथम, कालच्या बालासोर इथल्या दुर्दैवी रेल्वे दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. खेलो इंडिया विद्यापित क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तरप्रदेशने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राज्यात खेळ आणि खेळाडूंना खूप महत्व दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, उत्तरप्रदेशने KIUGUP2022 चे यशस्वी आयोजन सुनिश्चित केले.
उत्तर प्रदेश सरकारच्या आणि सर्व यजमान विद्यापीठांच्या चमूचे मी अभिनंदन करतो, आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या खेळाडूंच्या सुख-सोयींमध्ये उत्तरप्रदेश सरकारने कोणतीही कसर ठेवली नाही, आणि भारत सरकारच्या वतीने मी उत्तरप्रदेश सरकारला धन्यवाद देतो. त्याशिवाय, वाराणसीमध्ये सिग्रा येथे एक आधुनिक सुविधा निर्माण केली जात असून, ती लवकरच सर्व खेळाडूंना सुपूर्द केली जाईल. आपण लवकरच भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवू.
***
N.Chitale/S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929694)
Visitor Counter : 233