आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीमधील तंबाखूजन्य उत्पादनांच्या ऑनलाइन चित्रणाच्या नियमनासाठीची ओटीटी मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली जारी
तंबाखूजन्य उत्पादने किंवा त्यांचा वापर प्रदर्शित करणार्या ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीच्या प्रकाशकांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक
स्थिर संदेश म्हणून प्रदर्शित केलेला तंबाखूविरोधी आरोग्य विषयक इशारा देणारा संदेश पांढर्या पार्श्वभूमीवरील काळ्या अक्षरांसह सुवाच्य आणि समजण्याजोगा असावा, आणि यामध्ये "तंबाखूमुळे कर्करोग होतो" किंवा "तंबाखूमुळे मृत्यू येतो" अशा इशाऱ्यांचा समावेश असणे बंधनकारक
नागरिकांनी तंबाखूच्या विळख्यातून मुक्त होऊन निरोगी जीवन स्वीकारावे असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2023 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस. सिंह बघेल यांच्या उपस्थितीत, ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीमधील तंबाखूजन्य उत्पादनांच्या ऑनलाइन चित्रणाच्या नियमनासाठीची ओटीटी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. तंबाखूजन्य उत्पादने किंवा त्यांचा वापर प्रदर्शित करणार्या ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीच्या प्रकाशकांनी या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असेल. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन 2023 साजरा करण्यासाठी हायब्रीड माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला होता. "आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे”, ही या वर्षीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीमधील तंबाखूच्या वाढत्या सेवनाबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकांना तंबाखूच्या विळख्यातून मुक्त होण्याचे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. "तंबाखू सेवनाचे गंभीर परिणाम आणि त्यामुळे होणारे नुकसान, याबद्दल तरुणांमध्ये आणि देशात व्यापक जागरूकता निर्माण करण्याची हीच वेळ आहे", डॉ मांडवीय म्हणाले. जनअभियानाच्या माध्यमातून मिशन मोडमध्ये लोकभागीदारी मोहीम सुरू करण्याचा विचार त्यांनी मांडला. लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आणि तंबाखूचे सेवन करण्यापासून रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना, आजची ओटीटी मार्गदर्शक तत्त्वे तंबाखूचे सेवन थांबवण्यामध्ये खूप मोठा टप्पा गाठतील, हे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी जारी केलेल्या नवीन नियमावलीची ठळक वैशिष्ट्ये: -
- आरोग्य विषयक धोके, संदेश, अस्वीकृती: तंबाखूजन्य उत्पादने किंवा त्यांचा वापर प्रदर्शित करणार्या ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीच्या प्रकाशकांनी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असेल. यामध्ये तंबाखूमुळे आरोग्याला असलेल्या धोक्याचे प्रदर्शन समाविष्ट आहे, जे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यावर प्रत्येकी किमान तीस सेकंद टिकेल. शिवाय, प्रकाशकांनी तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर करतानाचे चित्रीकरण दाखवताना, स्क्रीनच्या तळाशी एक प्रमुख स्थिर संदेश म्हणून तंबाखूविरोधी आरोग्य विषयक इशारा प्रदर्शित करणे आवश्यक आहे. याशिवाय, तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यावर, प्रत्येकी किमान वीस सेकंद टिकणारी ऑडिओ-व्हिज्युअल (दृक-श्राव्य) अस्वीकृती दाखवली जाणे आवश्यक आहे.
- आशय उपलब्धता : प्रकाशकाला हेल्थ स्पॉट्स, संदेश आणि अस्वीकरण ऑनलाइन क्युरेट केलेल्या आशयाच्या "mohfw.gov.in" किंवा "ntcp.mohfw.gov.in" या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
- सुवाच्यता आणि भाषा: स्थिर संदेश म्हणून प्रदर्शित केलेला तंबाखू विरोधी आरोग्य इशारा संदेश सुवाच्य आणि वाचनीय असावा, पांढर्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाच्या अक्षरांमध्ये "तंबाखूमुळे कर्करोग होतो" किंवा "तंबाखूमुळे मृत्यू येतो" अशा इशाऱ्याचा समावेश असणे आवश्यक आहे.
- प्रदर्शनावरील मर्यादा: तंबाखू उत्पादनांचे प्रदर्शन किंवा ऑनलाइन क्युरेट केलेल्या आशयामध्ये सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या ब्रँड्स किंवा तंबाखू उत्पादनाच्या कोणत्याही स्वरूपाचा समावेश करण्यास मनाई आहे. याव्यतिरिक्त, तंबाखू उत्पादनांचे प्रदर्शन किंवा जाहिरातविषयक सामग्रीमध्ये त्यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीद्वारे स्वतःहून किंवा तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाई केली जाऊ शकते. ही समिती ऑनलाइन क्युरेट केलेल्या सामग्रीच्या प्रकाशकाची ओळख पटवेल आणि तरतुदींचे पालन करण्यात आलेल्या अपयशाच्या कारणांचे स्पष्टीकरण करण्याची वाजवी संधी देणारी नोटीस जारी करेल आणि आशयामध्ये योग्य सुधारणांची अपेक्षा करेल.

या कार्यक्रमाची लिंक: https://youtube.com/live/2mmRXtJ6ar8?feature=share
तंबाखू सेवन न करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यासाठी लिंक: https://pledge.mygov.in/no-tobacco-2023/
* * *
N.Chitale/Rajshree/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928846)
आगंतुक पटल : 289