कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे “पर ड्रॉप मोअर क्रॉप” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
2015-16 पासून आतापर्यंत 78 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले
Posted On:
31 MAY 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे आज दिल्ली येथे “पर ड्रॉप मोअर क्रॉप (PDMC)” या विषयावर एका राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. देशात सूक्ष्म सिंचनाच्या वाढीव वापरासाठी अमलात आणता येणाऱ्या विविध पर्यायांवर या क्षेत्रातील हितसंबंधींशी चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, सिंचन उद्योग, जल व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे स्टार्टअप आणि शेतकरी उत्पादक संघटना या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सुक्ष्म सिंचन उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आणि सूक्ष्म सिंचन व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्रित दृष्टीकोन यावर आहुजा यांनी आपल्या भाषणात भर दिला. सूक्ष्म सिंचनामुळे देशाची अन्न आणि पोषण सुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न, विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या भागात शेतीची एकूण कार्यक्षमता आणि जल उत्पादकता वाढेल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांतील पाच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना उच्च सूक्ष्म सिंचन अवलंब आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला. याशिवाय, सूक्ष्म-सिंचन क्षेत्रातील आघाडीच्या राज्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये सूक्ष्म-सिंचन व्याप्ती आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या पद्धती आणि नाविन्यपूर्ण पद्धतीही या कार्यक्रमात इतरांबरोबर सामायिक केल्या. सूक्ष्म सिंचन उद्योग सदस्यांनी या राष्ट्रीय प्राधान्य कार्यक्रमात सरकारच्या प्रयत्नांना सक्रिय पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928838)
Visitor Counter : 138