विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षात अंतराळ संशोधन आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे भारताची वैज्ञानिक मनोवृत्ती आणि नैपुण्याचे जगाला दर्शन; उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवरील निवडक देशांमध्ये भारताचा झाला समावेश - डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
31 MAY 2023 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची सार्वत्रिक दखल घेतली गेली आहे.
मंत्री म्हणाले, ल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात, विज्ञान क्षेत्रातील भारताच्या सामर्थ्याने उदयोन्मुख तंत्रज्ञान असलेल्या आघाडीच्या राष्ट्रांच्या निवडक देशांमध्ये भारताला समाविष्ट केले.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील सीएसआयआरच्या मनुष्य बळ विकास केंद्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 46 व्या तुकडीचे स्वागत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, काहीजणांनी भारताच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र देशाने कोविड 19 महामारीचा यशस्वीपणे सामना केला.
स्टार्टअप्सची संख्या (77,000)आणि युनिकॉर्नच्या (107) संख्येबाबतीत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे, याचप्रमाणे तंत्रज्ञान व्यवहारांसाठी जगातील सर्वात आकर्षक गुंतवणूक स्थळांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, अंतराळ नियमांमध्ये सुधारणा केल्यामुळे स्टार्टअप्समध्येही नाविन्यपूर्ण क्षमता निर्माण झाली आहे. तीन- चार वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रासंबंधित स्टार्ट-अप्सची संख्या अवघी दोन होती मात्र आज आपल्याकडे अवकाशातील अत्याधुनिक क्षेत्रात कार्यरत असलेले 102 स्टार्टअप्स आहेत. अंतराळामध्ये उपग्रहांमध्ये अंतर्गत दुरूस्ती आणि इतर घटकांचे व्यवस्थापन करणे, नॅनो उपग्रह, प्रक्षेपण वाहन, ग्राउंड सिस्टम, संशोधन, अशा विविध प्रकारची कामे स्टार्ट- अप मधून केली जातात.
सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे, गेल्या पाच वर्षांत संरक्षण निर्यातीत 334% वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या क्षेत्राने विक्रमी 13,000 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. भारत आता 75 हून अधिक देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत हा जगातील अन्नधान्य, फलोत्पादन आणि पशुधन-कुक्कुटपालन उत्पादक देशांपैकी एक आहे आणि काही प्रमाणात जागतिक अन्नाची गरज भागवत आहे.
मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2023 मध्ये 2023-31 या कालावधीसाठी एकूण 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या ‘नॅशनल क्वांटम मिशन’ ला (एनक्यूएम) मंजुरी दिली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकासाची वृत्ती रुजवून त्याची जोपासना आणि वाढ करणे तसेच तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी (क्यूटी ) मध्ये एक सळसळती आणि नाविन्यपूर्ण परिसंस्था तयार करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. यामुळे ‘क्यूटी’ अंतर्गत आर्थिक विकासाला गती मिळेल, देशातील परिसंस्थेचे पोषण होईल आणि क्वांटम टेक्नॉलॉजीज अँड अॅप्लिकेशन्स च्या विकासात भारताला आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक बनवेल.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928713)
Visitor Counter : 173