खाण मंत्रालय

स्थैर्य आणि क्षमता यामुळे देशाच्या आदरणीयतेत भर झाली आहे : केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री


शाश्वत तसेच सर्वोत्तम खनन तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे; त्यासाठी स्टार्ट-अप उद्योग अत्यंत आवश्यक आहेत: केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते आयआयटी मुंबई येथे खाणकामविषयक पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेचे उद्घाटन

केंद्रीय खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली खाणकामविषयक पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेचे समारोप सत्र

Posted On: 29 MAY 2023 4:25PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2023

 

“विद्यमान सरकारचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.या 9 वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत. स्थैर्य आणि क्षमता यांनी देशाच्या आदरणीयतेत भर पडली आहे,” असे  केंद्रीय कोळसा आणि खाण तसेच संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. मुंबईत पवई येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे पहिल्या खाणकामविषयक स्टार्ट-अप शिखर परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र राज्य सरकारमधील खाण मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खाण मंत्रालय सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय खाण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव संजय लोहिया,आणि आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी हे देखील उपस्थित होते.

खाणकाम विषयक या पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, “आज या खाणकाम विषयक पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेच्या माध्यमातून आपण या क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांना वास्तवात रुपांतरीत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेमध्ये 82 स्टार्ट-अप उद्योग आणि 140 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. निर्यातीवरील अवलंबित्व खर्चात वाढ करते आणि परकीय चलनाचा खर्च देखील वाढविते. आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण नव्या कल्पना आणि नवे विचार राबविले पाहिजेत.”

गेल्या 9 वर्षांत झालेल्या विकासाचा अधिक तपशील देताना, केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “वर्ष 2014 मध्ये होत असलेल्या 500 दशलक्ष टन कोळसा उत्पादनात वाढ करून आता आपण जगातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक आणि आयातक झालो आहोत. आपल्या देशात आता जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळशाचा साठा आहे. यावर्षी देशातील कोळशाचे उत्पादन 850 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. 2025-26 पर्यंत औष्णिक कोळश्याची आयात पूर्णपणे थांबेल अशी आमची आशा आहे. त्यासोबतच, खाणीचा शोध आणि लिलाव यांसाठी पारदर्शक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून मुखत्यारीबाबतचे सर्व अधिकार संपविण्यात आले आहे. वर्ष 2014 मध्ये देशात 300 स्टार्ट-अप उद्योग कार्यरत होते, गेल्या 9 वर्षांत आपण एक लाख स्टार्ट-अप आणि सुमारे शंभर युनिकॉर्न उद्योगांपर्यंत झेप घेतली आहे. या उद्योगांनी 9 लाख नोकऱ्या निर्माण केल्या असून देशाच्या उलाढालीत 333 अब्ज डॉलर्स मूल्याची भर घातली आहे. मात्र आपल्याला ही वाढ अशीच पुढे सुरु ठेवली पाहिजे. शाश्वत आणि सर्वोत्तम  खनन तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी स्टार्ट-अप उद्योग अत्यंत आवश्यक आहेत.”

स्टार्ट अप्सला पाठबळ देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना जोशी म्हणाले, “ उद्योग आणि व्यवसायांनी चांगली कामगिरी करावी ही सरकारची त्यांना पाठबळ देण्यामागील भूमिका आहे. उद्योग आणि व्यवसायांकडून मिळणाऱ्या महसुलाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत सरकार मदत करू इच्छिते. जेव्हा लोक आणि सरकार परस्परांवरील विश्वास आणि निष्ठा यांनी काम करतात तेव्हा अधिक चांगले बदल घडून येतात.”

सार्वजनिक उपक्रमांनी स्टार्ट अप्सकडून उत्पादनांची खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात निधी राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

केंद्रीय कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी खाणकामविषयक पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेच्या समारोप सत्राचे अध्यक्षपद भूषविले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की या खाणकामविषयक पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषद 2023 मध्ये सहभागी झालेल्यांनी खनन क्षेत्रात नवोन्मेष वाढविण्याचे उपाय आणि मार्ग यावर विचारमंथन केले. दिवसभर चाललेल्या अशा सत्रांतील चर्चेतून हाती आलेले ज्ञान अनेक उपाय सुचवण्यासाठी उपयुक्त ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खनन क्षेत्रातील नवोन्मेष तसेच विकासविषयक प्रयत्न वाढविण्याचा निश्चय केला आहे अशी माहिती देत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले की आपला देश खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध आहे तरीही आपल्याला काही खनिजांची आयात करावी लागते. नव्या खाणींचा शोध घेण्यासाठी, त्यांच्या लिलावासाठी तसेच त्यांचे खनिज उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला, तर कदाचित यापुढे आपल्याला खनिजांची आयात करावी लागणार नाही.  

 

केंद्रीय खाण मंत्रालय सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय खाण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव संजय लोहिया, केंद्रीय खाण मंत्रालयातील सहसचिव फरीदा नाईक आणि आयआयटी मुंबईच्या गव्हर्नर्स  मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद सराफ हे देखील या समारोप सत्रामध्ये उपस्थित होते.

 

उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले, “ अपरिमित संधींचा हा काळ आहे. म्हणूनच या शिखर परिषदेची देखील ती टॅग लाईन आहे. पंतप्रधानांच्या अमृत काळाच्या दृष्टीकोनानेही याचाच दाखला दिला आहे.”

त्यापूर्वी कोळसा आणि संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या  एका कला प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केले.  

   

 

पहिल्या खाणकाम स्टार्ट अप शिखर परिषदेविषयी

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने पहिल्या खाणकाम स्टार्ट अप शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन समारंभानंतर होणाऱ्या तांत्रिक सत्रांमध्ये खाणमंत्री खाणकाम आणि धातूविज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्ससोबत संवाद साधतील. विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे स्टार्ट अप्स कशा प्रकारे खाणकाम क्षेत्रातील विविध प्रक्रियांमध्ये योगदान देतील आणि उत्खनन आणि खाणकाम क्षमतेत वाढ करतील आणि एकंदर खाणकाम क्षेत्राच्या कार्यक्षमतेत वाढ करू शकतील यावर विचारमंथन करण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरेल.

या शिखर परिषदेत खनिज उत्खनन क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांसोबत, वित्तीय संस्था आणि बँकांसोबत संवादावर देखील भर देण्यात येईल. विद्यार्थी आणि उत्खनन, व्हर्चुअल रिऍलिटी, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सल्ला सेवा  इत्यादी  क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुण व्यावसायिकांना देखील या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Shailesh/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928094) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil