भूविज्ञान मंत्रालय

केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राला (एनसीपीओआर) दिली भेट, भू-विज्ञान क्षेत्रात एनसीपीओआर ने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत हिमालयीन क्षेत्रामधील संशोधन उपक्रमांचा विस्तार करण्याच्या गरजेवर दिला भर


अंटार्क्टिकामधील भारती स्थानकावर तैनात शास्त्रज्ञांशी केंद्रीय मंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साधला संवाद

Posted On: 26 MAY 2023 6:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) येथे भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी एनसीपीओआर ने हाती घेतलेले महत्वाचे कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेचे महत्वाचे काम प्रदर्शित करण्यासाठी दिवसभर माहितीपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती. अंटार्क्टिकामधील भारती स्थानकावर तैनात असलेल्या समर्पित चमू बरोबर, केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचे सत्र या भेटीचे प्रमुख आकर्षण ठरले.

एनसीपीओआर मधील वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना किरेन रीजीजू यांनी त्यांच्या समर्पित कामाची प्रशंसा केली आणि केंद्रांची अफाट क्षमता आणि त्याचे महत्व यांना पुष्टी दिली. भारतीयांच्या वाढत्या आकांक्षा आणि जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्त्व, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

वैज्ञानिक प्रगतीसाठी एनसीपीओआर ने दिलेल्या योगदानाची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी  सध्या अंटार्क्टिका इथल्या मोहिमेवर तैनात असलेल्या यशस्वी पथकाची प्रशंसा केली आणि ते परतल्यावर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले. विशेषतः हिमालयीन प्रदेशात संशोधन उपक्रम वाढवण्याच्या आणि त्याचा विस्तार करण्याच्या गरजेवर भर देत, यामध्ये प्रचंड वाव असून, अधिक संशोधनाची गरज निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी विज्ञानाच्या परिवर्तनशीलतेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तर्कसंगत दृष्टिकोनाची गरज असल्याचे सांगितले. वैज्ञानिक समुदायाला त्यांचे उद्दिष्ट साध्य करायला सक्षम करण्यासाठी आवश्यक साधन-संपत्ती, धोरणे आणि पाठबळ प्रदान करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, संशोधकांनी केलेल्या कामाबद्दल जागृती निर्माण करून त्याला ओळख मिळवून देण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला आणि वैज्ञानिक उपक्रमांमध्ये सार्वजनिक सहभाग आणि प्रशंसा वाढवण्याचे आवाहन केले.

एनसीपीओआर चे संचालक डॉ. थंबन मेलोथ यांनी केंद्रीय भू-विज्ञान मंत्री किरेन रीजीजू यांच्या या भेटीबद्दल आभार व्यक्त केले. ध्रुवीय प्रदेशात वैज्ञानिक संशोधन आयोजित करण्यासाठी गुंतागुंतीच्या लॉजिस्टिकमधील अपवादात्मक कौशल्ये आणि सार्वजनिक संस्था, इतर संस्था आणि विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, एनसीपीओआर ध्रुवीय आणि महासागर संशोधनात उल्लेखनीय प्रगती करेल आणि या क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या भेटीमध्ये अंटार्क्टिक प्रदेशाचा व्हर्च्युअल रिअॅलिटी शो आणि आइस कोअर लॅब आणि अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंटेशन सुविधेची भेट याचा समावेश होता. या ठिकाणी एनसीपीओआर च्या वैज्ञानिकांनी वापरलेल्या अत्याधुनिक संशोधन पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले होते.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927588) Visitor Counter : 119


Read this release in: English , Urdu , Hindi