नौवहन मंत्रालय
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्र्यांनी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगला दिली भेट ; पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने हरित वाहतूक विकसित करण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2023 8:24PM by PIB Mumbai
मुंबई, 25 मे 2023
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबई येथील इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) मुख्यालयाला भेट दिली आणि संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संस्थेतील विविध स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या नियम आणि संशोधन व विकास चमूबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी संशोधन प्रकल्पांचे विविध पैलू जाणून घेतले.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगने हाती घेतलेल्या हरित उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. सोनोवाल यांनी नौवहनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग डिझाइन आणि परिचालन पद्धतींना कशा प्रकारे सहाय्य करत आहे हे देखील जाणून घेतले. इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या अधिकार्यांना संबोधित करताना, त्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर प्रामुख्याने भर दिला आणि प्रगतीचा परिसंस्था आणि पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

जागतिक स्तरावर ओळख निर्माण केल्याबद्दल आणि ताफ्यात वाढ केल्याबद्दल सोनोवाल यांनी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या चमूचे अभिनंदन केले.ते म्हणाले की, गेल्या 48 वर्षांतील आयआरएसचे योगदान कौतुकास्पद आहे. देशातील सागरी परिसंस्थेच्या विकासासाठी आयआरएसने यापुढेही मोठी भूमिका पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.

* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1927346)
आगंतुक पटल : 111