संरक्षण मंत्रालय
भारताला भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा ‘अनुकरणकर्ता’ नव्हे तर ‘नेता’ म्हणून घडवण्यासाठी अभिनव संशोधन करा: नवी दिल्ली येथे सीआयआयच्या वार्षिक सोहोळ्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे उद्योग धुरिणांना आवाहन
“जागतिक पातळीवरील सध्याच्या परिस्थितीत, भारताच्या विकास आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील संशोधन तसेच विकास आवश्यक
Posted On:
25 MAY 2023 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2023
भारताला भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा ‘अनुकरणकर्ता’ नव्हे तर ‘नेता’ म्हणून घडवण्यात मदत करण्यासाठी तसेच जागतिक पातळीवरील सध्याच्या परिस्थितीत, उद्भवू शकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यासाठी अभिनव संशोधनविषयक उपाय शोधण्याचे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्योग क्षेत्रातील धुरिणांना केले आहे. नवी दिल्ली येथे आज, 25 मे 2023 रोजी झालेल्या सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. “भविष्यातल्या आघाड्या : स्पर्धात्मकता, तंत्रज्ञान शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीयत्व” ही या सत्राची संकल्पना होती.
आजच्या युगात,संरक्षण विषयक समीकरणे अभूतपूर्व वेगाने बदलत आहेत आणि विविध देश पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्यूटिंग, अनुवंशशास्त्र यांसारख्या क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर लक्ष केंद्रित करत आहेत असे ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्र्यांनी केले.यामध्ये तंत्रज्ञानाच्या शर्यतीत मागे न राहण्याचे आव्हान आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर मोठी झेप घेण्यासाठी मदत होईल अशा उद्देशाने उल्लेखनीय कार्य करण्याची संधी अशा दोन्ही बाबी अंतर्भूत आहेत असे ते म्हणाले.
हे ध्येय साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन तसेच विकास हा एकच मार्ग आहे आणि त्यातून आजच्या काळात कोणत्याही देशाचा विकास तसेच संरक्षण यांसाठी नवे मार्ग खुले होत आहेत असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. “सतत बदलत्या जागतिक परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी स्वतःला सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आपण नवी ध्येये निश्चित केली पाहिजेत आणि नवोन्मेषी पद्धतीने ती साध्य केली पाहिजेत.ज्या गोष्टींकडे साधन संपत्तीचे स्त्रोत म्हणून पाहिले जाते त्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांमध्ये रुपांतरीत करण्याची क्षमता संशोधन आणि विकास क्षेत्रात आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध साधन संपत्तीचा वापर सुधारतो. तंत्रज्ञान नेहमीच शक्तीचा गुणक म्हणून कार्य करते,” ते म्हणाले.
संरक्षण, आरोग्य, शिक्षण, कृषी, वाणिज्य आणि दळणवळण, यांसह विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी संशोधन तसेच विकास कार्याच्या गरजेवर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की यामुळे आपल्या देशाला इतर देशांहून सरस होता येईल. “स्वतःला सशक्त करण्यासाठी आपल्याला या क्षेत्रात इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागेल. आणि आपण तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहिलो तरच हे शक्य आहे,” ते म्हणाले.
तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी देशाला आवश्यक असलेल्या, भरपूर भांडवल, सशक्त संशोधन आणि विकास विषयक पायाभूत सुविधा, लोकसंख्येचा उपयुक्त भाग तसेच आधीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, समजून घेऊन पाया निर्माण करण्याची क्षमता यांसारख्या महत्त्वाच्या बाबी देखील केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, केंद्र सरकारने बँकिंग धोरण, नियामकीय धोरण, निधींचा पुरवठा, कामगार धोरण, शिक्षण तसेच आरोग्य धोरण यांच्यासारखी अनेक पावले उचलली आहेत आणि त्यातून युवा वर्गाला आणि उद्योग क्षेत्राला एकत्र येऊन काम करण्यासाठी तसेच देशातील संशोधन आणि विकास कार्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक मंच तयार करून दिला आहे.
युवावर्गाला देशाच्या लोकसंख्येच्या लाभांशातील एक महत्त्वाचा भाग संबोधत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की देशात स्टार्ट अप उद्योगांची सतत होत असलेली वाढ हा तरुण भारतीय मनांची क्षमता, उर्जा आणि उत्सुकता यांचा परिणाम आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927284)
Visitor Counter : 100