नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने खास हेलिकॉप्टर मार्गांसाठी डिझाईन केलेल्या उडान 5.1 चा केला प्रारंभ
Posted On:
24 MAY 2023 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2023
प्रादेशिक संपर्क योजनेच्या (RCS) -उडे देश का आम नागरिक (UDAN) च्या चार यशस्वी आवृत्तीनंतर आणि सध्या चालू असलेल्या 5.0 या पाचव्या आवृत्ती नंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढवण्यासाठी आणि हेलिकॉप्टरद्वारे शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यासाठी UDAN 5.1 सुरु केले आहे.
प्रादेशिक संपर्क योजन- उडान अंतर्गत प्रथमच खास हेलिकॉप्टर मार्गांसाठी ही आवृत्ती तयार करण्यात आली आहे.
याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
- परिचालनाच्या व्याप्तीमध्ये वाढ, या योजनेअंतर्गत आता प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण किंवा गंतव्य स्थान यापैकी एक जर प्राधान्य क्षेत्रामध्ये असेल तर त्या मार्गांना अनुमती दिली जाईल. याआधी दोन्ही ठिकाणे प्राधान्य क्षेत्रात असणे आवश्यक होते.
- प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरमधून प्रवास अधिक परवडणारा बनवण्यासाठी विमानभाड्याची कमाल मर्यादा 25% ने कमी करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत निर्धारित मार्गावरील परिचालनाची आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यता वाढवण्यासाठी एकेरी आणि दुहेरी इंजिन हेलिकॉप्टरसाठी ऑपरेटर्सच्या व्हाएबिलिटी गॅप फंडिंगच्या मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
“उडान योजनेची ही नवीन आवृत्ती भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील दोन उदयोन्मुख वास्तविक स्थितीचा पुरावा आहे - एक, शेवटच्या टोकापर्यंत कनेक्टिव्हीटी सुनिश्चित करण्याबरोबरच विमान प्रवासाचे लोकशाहीकरण. आणि दुसरे, पर्यटनाला चालना देण्यासाठी हेलिकॉप्टरची वाढती मागणी . या प्रयत्नांमुळे हेलिकॉप्टरचा अधिकाधिक वापर पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्र तसेच आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना देण्यास मदत मिळेल. उडान 5.1 केवळ नागरी उड्डाणासाठीच नाही तर भारतातील दुर्गम आणि सेवा पोहचू न शकलेल्या प्रदेशांसाठीही एक नवीन सुरुवात आहे असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले.
हेलिकॉप्टर ऑपरेटरसह सर्व हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर उडान योजनेची सध्याची आवृत्ती तयार करण्यात आली आहे. शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हे उद्दिष्ट असले तरी, भारतीय नागरी विमान वाहतूक उद्योगाच्या हेलिकॉप्टर विभागाला अत्यावश्यक चालना देण्याचाही हा प्रयत्न आहे.
आजपर्यंत या योजनेच्या मागील आवृत्तीअंतर्गत 46 हेलिकॉप्टर मार्ग कार्यान्वित केले आहेत ज्याचा फायदा अनेक डोंगराळ राज्ये तसेच ईशान्येकडील राज्यांना झाला आहे आणि या आवृत्तीत जास्तीत जास्त मार्गांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य आहे.
उडान योजनेअंतर्गत प्रवाशांना हवाई कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळाला आहे, विमान कंपन्यांना प्रादेशिक मार्गांवरील सेवेसाठी सवलती मिळाल्या आहेत आणि सेवा पोहचू न शकलेल्या प्रदेशांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी हवाई संपर्क व्यवस्थेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. या योजनेची सध्याची आवृत्ती ही सामान्य माणसाला स्वस्त दरात विमान प्रवासाची सुविधा देण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927052)
Visitor Counter : 174