पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
मुंबईमधील जुहू चौपाटी येथे G20 मेगा बीच क्लीन अप मोहिमेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा सहभाग
G20 देशांच्या आणि देशभरातील 37 ठिकाणी आयोजित मोहिमेत सहभागी झालेल्यांचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मानले आभार
Posted On:
21 MAY 2023 1:46PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, आज मुंबईमध्ये जुहू चौपाटी इथल्या G20 मेगा बीच क्लीन अप मोहिमेत (सागरी किनारा स्वच्छता मोहीम) सहभागी झाले होते. यादव यांनी, G20 देशांच्या, तसेच देशभरातील 37 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आणि पर्यावरण सचिव लीना नंदन यांच्यासह, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यादव यांनी G20 मेगा बीच क्लीन अप मोहिमेचा भाग म्हणून आपले महासागर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याची शपथ घेतली.
भारताच्या G20 अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या G20 मेगा बीच क्लीन अप मोहिमेत G20 देश, निमंत्रित देश, राज्य सरकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि तिसर्या ECSWG बैठकीला उपस्थित असलेले प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि किनारपट्टी भागातील आणि सागरी परिसंस्था जतन करण्याच्या जागतिक वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.
सागरी कचऱ्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जनजागृती करणे, तसेच ते रोखण्यासाठी कृती करायला लोकांना प्रोत्साहन देणे, हे या मेगा बीच क्लीन अप मोहिमेचे उद्दिष्ट होते. हे पर्यावरणीय आव्हान थोपवण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न आणि समुदायाच्या सहभागाचे महत्त्व या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमात जगभरातील 20 देशांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मेक्सिको, कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे 14 G20 देश, आणि इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान आणि सिंगापूर हे 6 निमंत्रित या कार्यक्रमात सहभागी झाले. देशभरात सर्व 13 किनारी राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेशांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमामधील भागधारकांचा सक्रीय सहभाग हा, भारताच्या G20 अध्यक्षतेखालील ‘लोकसहभागाच्या’ सर्वात मोठ्या उदाहरणांपैकी एक ठरेल.
समुद्रकिनार्यावरील सेल्फी पॉइंट हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते, त्यानंतर प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून बनवलेल्या वस्तूंच्या स्टॉलनी सर्वांचे लक्ष वेधले. या ठिकाणी बेंच (बाके), कार डस्टबिन (गाड्यांमधील कचरा पेटी), आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवेल्या यासारख्या अनेक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जुहू चौपाटीवरून गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पुनर्निर्मिती करण्यात आली. यासाठी चौपाटीवर ठेवलेल्या रीसायकलिंग मशीनचा (पुनर्निमिती यंत्र) वापर करण्यात आला.
मान्यवरांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला, प्रतिज्ञा भिंतीवर आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या आणि शालेय मुलांनी काढलेल्या चित्रांची प्रशंसा केली. प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर कार्यक्रमाच्या संकल्पनेवर आधारित मनमोहक वाळू शिल्प तयार केले. यामध्ये G20 बोध चिन्हासह, प्रकृती हे LiFE (लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट) चे शुभंकर साकारले होते. किनारपट्टी आणि सागरी प्रदूषण या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेत देशभरातील सुमारे 5900 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी निवडक शंभर चित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती.
LiFE अर्थात ‘लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट’ ही भारताच्या अध्यक्षतेखाली प्रसारित केली जाणारी संकल्पना, या कार्यक्रमाच्या यशाची व्याख्या करणारा प्रमुख घटक ठरली. LiFE ही संकल्पना पर्यावरणीय समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी वैयक्तिक वर्तणुकीमधील बदलांना प्रोत्साहन देते. ती समुदायांमधील भागधारकांना एकत्रितपणे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, आपल्या रोजच्या जीवनात हवामान-अनुकूल पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देते.
मेगा बीच क्लीन अप कार्यक्रमाने 21 ते 23 मे, 2023 या कालावधीत मुंबईत होणाऱ्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीची सुरुवात झाली. या बैठकीत Ocean20 (महासागर 20) संवादावर विस्तृत चर्चा होईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरण, शासन, सहभाग आणि नील अर्थव्यवस्था अशा विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान करण्यासाठीचे एक व्यासपीठ ठरेल. भारताच्या अध्यक्षते अंतर्गत, G20 प्राधान्यक्रमांशी सुसंगत, शाश्वत आणि हवामान-प्रतिबंधक नील अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926095)
Visitor Counter : 282