पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मेक इन इंडिया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वदेशी कच्चा माल वापरून तयार करण्यात आलेले विमानांसाठीचे शाश्वत इंधन (एसएएफ) हे देशाला स्वावलंबी बनवण्याच्या तसेच हवाई वाहतूक क्षेत्राचे निःकार्बनीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी


भारताला वर्ष 2047 पर्यंत उर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी, पेट्रोलियम क्षेत्र ही गुरुकिल्ली आहे: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

Posted On: 19 MAY 2023 12:33PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेल्या स्पष्ट निर्देशांना अनुसरत, वर्ष 2047 पर्यंत उर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या गरजेवर  केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भर दिला आहे. हे स्वप्न साकार करण्यात पेट्रोलियम क्षेत्राला मोठे योगदान द्यावे लागेल हे वेगळे सांगायला नको,” असे ते म्हणाले. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित तेल उद्योग तसेच प्रसार माध्यमांतील प्रमुख व्यक्तींच्या समुदायाला ते संबोधित करत होते. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे सचिव पंकज जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.

हवाई वाहतूक क्षेत्राचे निःकार्बनीकरण करण्याच्या दिशेने करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडीत, स्वदेशी पद्धतीने निर्माण केलेले विमानासाठीचे शाश्वत इंधन वापरुन आज सकाळी भारताच्या पहिल्या व्यावसायिक विमानाने भरारी घेतली. भारतीय तेल महामंडळाने, प्राज उद्योग या कंपनीच्या सहकार्याने पुरविलेले एसएएफ मिश्रित हवाई टर्बाईन इंधन भरलेल्या एअर आशिया कंपनीच्या I5 767 या विमानाने पुणे ते दिल्ली असा प्रवास केला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीच्या विमानतळावर या विशेष विमानाचे स्वागत केले.

हा प्रसंग म्हणजे वर्ष 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या देशाच्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगत केंद्रीय मंत्री म्हणाले, “या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार असणे आणि एसएएफ मिश्रित एटीएफ भरलेल्या पहिल्या व्यावसायिक विमानाचे स्वागत करणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. प्रात्यक्षिक तत्वावर, 1%पर्यंत मिश्रण केलेले एसएएफ वापरून उड्डाण केलेलं हे भारताचे पहिले देशांतर्गत व्यावसायिक उड्डाण असेल.”  “वर्ष 2025 पर्यंत विमानांच्या इंधनात आपण 1%एसएएफ मिश्रित करून वापरण्याचे उद्दिष्ट ठेवले तर भारताला दर वर्षी सुमारे 14 कोटी लिटर एसएएफ ची गरज भासेल,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

पर्यायी तसेच शाश्वत इंधन स्त्रोतांच्या गरजेवर भर देत केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये एसएएफ उत्पादन तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाली आहे. पारंपरिक विमान इंधनांच्या उत्पादनापेक्षा  एसएएफचे उत्पादन वेगळ्या पद्धतीने आणि शेतीतून निघणारा कचरा, महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा आणि वन अवशेष यांसारख्या नवीकरणीय स्त्रोतांपासून होते. म्हणजेच एसएएफमध्ये पारंपरिक विमान इंधनापेक्षा हरितगृह वायूंचे उत्सर्जन 80%पर्यंत कमी करण्याची क्षमता आहे.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले, “उसाच्या काकवीसारखा स्वदेशी कच्चा माल आणि स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात एसएएफचे झालेले उत्पादन म्हणजे वर्ष 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने असलेल्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून देशाला स्वावलंबी बनवण्याच्या तसेच हवाई वाहतूक क्षेत्राचे निःकार्बनीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. राष्ट्रीय पातळीवर निश्चित केलेली योगदाने (एनडीसीज म्हणजेच वर्ष 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रता वर्ष 2005 मधील तीव्रतेच्या तुलनेत जीडीपीच्या 45% पर्यंत कमी करण्याची कटिबद्धता) पूर्ण करण्यासाठी आज भारत, उर्जा स्थित्यंतर, तसेच जैवइंधनासारखे पर्यायी उर्जा स्त्रोत यांच्या बाबतीत जगातील एक सशक्त आवाज झाला आहे.

या ऐतिहासिक दिवसानिमित्त बोलताना, केंद्रीय मंत्री पुरी अत्यंत अभिमानाने म्हणाले, “उसाच्या काकवीसारखा स्वदेशी जैविक कच्चा माल वापरण्यामुळे, आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला तेजी येईल आणि त्याचसोबत शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू लागेल. एसएएफच्या 1%  मिश्रणाच्या पद्धतीमुळे, देशातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्यांचा ऊस यासाठी कच्चा माल म्हणून पुरवता येईल. तसेच एक लाखांहून अधिक हरित रोजगार निर्माण होतील.आत्मनिर्भरतेचे हे पाऊल देशाला आंतरराष्ट्रीय एसएएफ केंद्राचे रूप देऊन मोठा बदल घडवून आणेल असे ते पुढे म्हणाले.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1925524) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil