नौवहन मंत्रालय

डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्सवरील सर्वेक्षण अहवालात सर्व मंत्रालये/विभागांमध्ये बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाला दुसरे स्थान मिळाले

Posted On: 13 MAY 2023 11:25AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2023

 

2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स मूल्यांकनामध्ये 66 मंत्रालयांमध्ये बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने उल्लेखनीय कामगिरी करत दुसरे स्थान मिळवले आहे. या मंत्रालयाने 5 पैकी 4.7 गुण मिळवले असून यातून डेटा गव्हर्नन्समध्ये उत्कृष्टतेप्रति मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित होते.

नीती आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालयाद्वारे आयोजित, डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्ससंबंधी सर्वेक्षणाचे उद्दिष्ट प्रशासकीय डेटा व्यवस्थेची परिपक्वता पातळी तसेच  केंद्रीय क्षेत्र योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत  विविध मंत्रालये आणि विभागांच्या निर्णय प्रक्रियेतील त्यांच्या वापराचे मूल्यमापन करणे  हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुस्पष्ट मार्ग परिभाषित करताना, डेटाची वेगवान देवाणघेवाण  आणि मंत्रालयात त्याचा समन्वयात्मक वापर करण्यासाठी सुधारणा आवश्यक असल्याचे यात नमूद केले आहे.  डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स मूल्यांकनामध्ये डेटा निर्मिती, डेटाचा दर्जा , तंत्रज्ञानाचा वापर, डेटा विश्लेषण, त्याचा वापर आणि प्रसार, डेटा सुरक्षा आणि मनुष्यबळ क्षमता आणि केस स्टडी सह सहा प्रमुख संकल्पनांचा समावेश आहे.

डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स मूल्यांकनामध्ये बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाला मिळालेल्या या यशात आयआयटी मद्रास येथील  बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राच्या एकत्रित प्रयत्नांची मदत झाली आहे. या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राला डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स मानकांचे पालन करून बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाची व्यवस्थापन माहिती प्रणाली सुधारण्याचे काम सोपवले होते.  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने  सागरमाला अंतर्गत मंत्रालयाची  तंत्रज्ञान शाखा म्हणून बंदरे , जलमार्ग आणि किनारपट्टी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र  विकसित केले आहे. डेटा प्रवाह आणि  डेटा गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच AI/ML सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या उद्देशाने डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्सने बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या  सागरमाला, संशोधन आणि विकास, नौवहन, ALHW, IWAI आणि IWT या पाच योजनांसाठी MIS पोर्टल्सचे मूल्यमापन केले आहे.

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923859) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu