कृषी मंत्रालय

केंद्रीय मंत्री तोमर यांच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटना सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची 8 वी बैठक संपन्न


शांघाय सहकार्य संघटनेने भारताच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट कृषी कृती योजना स्वीकारली

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान मोदी यांचा भर - तोमर

Posted On: 12 MAY 2023 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2023

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची 8वी बैठक आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यात भारतासह रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, चीन आणि पाकिस्तान सहभागी झाले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली, एससीओ सदस्य देशांनी स्मार्ट कृषी प्रकल्प स्वीकारला. स्मार्ट कृषी कृती आराखडा आणि कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर आहे. यादृष्टीने भारताने स्मार्ट शेतीला चालना देण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत.

भारताच्या वतीने एससीओच्या बैठकीत सर्वांचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, भारत बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षाविषयक, आर्थिक स्थिती आणि लोकांशी संवाद वाढवण्यासाठी एससीओ सोबतच्या ऋणानुबंधांना महत्त्व देतो.

तोमर म्हणाले की, भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शेतकर्‍यांसाठी किंमत समर्थन प्रणाली जगात अनोखी आहे. आपल्या धोरणकर्त्यांची दूरदृष्टी, कृषी शास्त्रज्ञांची कार्यकुशलता आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे की आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. भारत तृणधान्ये, फळे, भाज्या, दूध, अंडी, मासे यासारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर आहे. नवोन्मेष, डिजिटल शेती, हवामानाधारित स्मार्ट तंत्रज्ञान, उच्च उत्पन्न देणाऱ्या, बायोफोर्टिफाइड वाणांचा विकास, कृषी संशोधन यात एकत्रित प्रयत्न करून देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशातील अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला देय असलेले 6,000 रुपये दिले जात आहेत आणि आतापर्यंत सुमारे 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांनी स्वागतपर भाषण केले. शांघाय सहकार्य संघटना सचिवालयाचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उच्च अधिकारी आणि एससीओ सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1923788) Visitor Counter : 131


Read this release in: English , Urdu , Tamil