अर्थ मंत्रालय
वित्तीय सेवा विभागाचे सचिव डॉ, विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अर्थपुरवठाविषयक कामगिरीच्या आढावा बैठकीचे आयोजन
Posted On:
12 MAY 2023 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2023
वित्तीय सेवा विभागाचे(डीएफएस) सचिव डॉ, विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या(आरआरबी) अर्थपुरवठाविषयक कामगिरीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 11-12 मे 2023 रोजी पुण्यामध्ये कृषी बँकिंग महाविद्यालयाने ‘प्रादेशिक ग्रामीण बँकांची अर्थसाह्य विषयक शाश्वती आणि परिचालनात्मक व्यवहार्यता बळकट करणे’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले. या परिसंवादाचाच एक भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डीएफएसचे अतिरिक्त सचिव, नाबार्डचे अध्यक्ष, आरबीआयचे सीजीएम, पुरस्कर्त्या बँकांचे एमडी/ईडी आणि आरआरबींचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
या बैठकीदरम्यान, आरआरबींनी त्यांच्या संबंधित व्यवहार्यता योजनांतर्गत निर्धारित केलेल्या मानकांनुसार केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 2021-22च्या तुलनेत 2022-23मध्ये आरआरबीच्या अर्थपुरवठाविषयक कामगिरीमध्ये भरीव सुधारणा झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच आरआरबींच्या तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरणाची गरज, थकीत कर्जात कपात करण्याची रणनीती, आयटी उपक्रम, वित्तीय समावेशनात सुधारणा, ग्रामीण भागात कर्ज वितरणात वाढ करणे आणि आरआरबींना पुरस्कर्त्या बँकांकडून दिले जात असलेले पाठबळ यांसारख्या इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना डॉ. जोशी यांनी पुरस्कर्त्या बँकांनी नाबार्डसोबत भागीदारीने त्यांच्याशी संबंधित आरआरबींना तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासंदर्भात अतिशय काळजीपूर्वक मार्गदर्शन करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला पाहिजे, यावर भर दिला. जेणेकरून या बँकांना त्यांच्या ग्राहकांना प्रभावी पद्धतीने सेवा देता येईल. व्यवहार्यता योजनांमध्ये निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये पुढल्या एका वर्षातच साध्य करण्यासाठी आपले प्रयत्न दुप्पट करण्याची सूचना डॉ. जोशी यांनी आरआरबींना केली.
S.Bedekar/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923783)
Visitor Counter : 135