संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


5,800 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

25 व्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

"आपल्याला देशाला विकसित आणि आत्मनिर्भर करायचे आहे"

आजच्या मुलांचा आणि तरुणांचा उत्साह, ऊर्जा आणि क्षमता ही भारताची मोठी ताकद : पंतप्रधान

भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, पण ते कोणालाही आपल्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला आणि एकात्मतेला धक्का पोहोचवू देणार नाही, हा संदेश पोखरणच्या अणुचाचण्यांनी दिला : संरक्षणमंत्री

Posted On: 11 MAY 2023 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त 11 मे 2023 रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्‌घाटन केले. 11 ते 14 मे या कालावधीत आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या 25 व्या वर्षाच्या सोहळ्याची सुरुवात देखील करण्यात आली. या महत्वाच्या प्रसंगी, पंतप्रधानांनी 5,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या देशातील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी का कार्यक्रम सुसंगत आहे. ज्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्यात हिंगोलीतील लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा - इंडिया (LIGO-इंडिया), ; ओडिशातील जटनी येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रआणि मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉकचा समावेश आहे.

या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांनी भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले आणि या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरणही केले.

11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रतिष्ठित दिवस आहे, असे पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना म्हणाले. आजच्याच दिवशी  भारतीय  शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अतुलनीय कामगिरी केली ज्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटला, असे ते म्हणाले. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही"असे पंतप्रधान म्हणाले. पोखरण अणुचाचणी मुळे भारताला आपल्या वैज्ञानिक क्षमता सिद्ध करता आल्याच मात्र यासोबतच जागतिक स्तरावरही राष्ट्राचे महत्व वाढले. "अटलजींच्या शब्दात सांगायचे झाले तर आपण आपल्या या अथक प्रवासात कधीच थांबलो नाही आणि मार्गात आलेल्या कोणत्याही आव्हानापुढे शरणागती पत्करली नाही." असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

आज उद्घाटन झालेल्या भविष्यवेधी प्रकल्पांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रीय हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा आणि मुंबईतील रेडिओलॉजिकल संशोधन केंद्र, फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा, विशाखापट्टणम मधील दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक प्रकल्प किंवा विविध कर्करोग संशोधन रुग्णालयांचा उल्लेख केला. आण्विक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असे ते म्हणाले. लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा - इंडिया (LIGO-India ) बद्दल बोलताना, पंतप्रधानांनी लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळेला 21 व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अग्रगण्य उपक्रमांपैकी एक असल्याचे सांगितले. या वेधशाळेमुळे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांना संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

आज अमृत काळाच्या सुरुवातीच्या काळात 2047 ची उद्दिष्टे आपल्यासमोर स्पष्ट आहेत, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. आपल्याला देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवायचे आहे, असे सांगत पंतप्रधांनी विकास, नवोन्मेष आणि शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. प्रत्येक पावलावर असलेलले तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि भारत या संदर्भात सर्वांगीण आणि 360-अंशाच्या दृष्टिकोनाने वाटचाल करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत तंत्रज्ञानाला आपले वर्चस्व गाजवण्याचे साधन नाही तर देशाच्या प्रगतीचे साधन मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाच्या स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ म्हणजेच तरुणांना नवोन्मेषासाठी आणि स्टार्टअप्स साठी प्रोत्साहन देणे या संकल्पनेची प्रशंसा करत, भारताचे भविष्य आजचे तरुण आणि मुले ठरवतील, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या मुलांचा आणि तरुणांचा उत्साह, ऊर्जा आणि क्षमता ही भारताची मोठी ताकद आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, माहितीसोबतच ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि भारत एक ज्ञान संपन्न समाज म्हणून विकसित होत असल्याने तो त्याच गतीने कृतीही करत आहे, असे त्यांनी सांगितले. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या 9 वर्षात देशात निर्माण झालेला मजबूत पाया त्यांनी विशद केला.

700 जिल्ह्यांतील 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा नवोन्मेषाच्या रोपवाटिका (नर्सरी) बनल्या आहेत. विशेष म्हणजे यातील 60 टक्के प्रयोगशाळा सरकारी आणि ग्रामीण शाळांमध्ये आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमध्ये 75 लाखांहून अधिक विद्यार्थी 12 लाखांहून अधिक नवोन्मेषी प्रकल्पांवर अथक परिश्रम घेऊन काम करत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हे तरुण शास्त्रज्ञ शाळांमधून बाहेर पडल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे हे चिन्ह आहे त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या प्रतिभेला जोपासणे आणि त्यांच्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी अटल नवोन्मेष केंद्रांमध्ये (एआयसी) इन्क्युबेट केलेल्या शेकडो स्टार्टअप्स संदर्भात नमूद करत हे स्टार्टअप्स 'नव्या भारताच्या नवीन प्रयोगशाळा म्हणून उदयाला येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील हे टिंकर-प्रिन्युअर्स लवकरच जगातील आघाडीचे उद्योजक बनतील, असे पंतप्रधान म्हणाले.

कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या महर्षी पतंजली यांचा उल्लेख करत, 2014 नंतर केलेल्या उपाययोजनांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. "स्टार्टअप इंडिया अभियान, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताला या क्षेत्रात नवीन उंची गाठण्यात मदत करणारे आहे", विज्ञान पुस्तकांच्या पलीकडे जाऊन  आता प्रयोगांच्या माध्यमातून पेटंटमध्ये रूपांतरित होत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.

10 वर्षांपूर्वी असणारी पेटंटची संख्या दरवर्षी 4000 वरून वाढून आज 30,000 पेक्षा अधिक झाली आहे. याच कालावधीत डिझाईन्सची नोंदणी 10,000 वरून 15,000 पर्यंत वाढली आहे. 70,000 हून कमी असलेली ट्रेडमार्कची संख्या 2,50,000 पेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

आजचा भारत सर्व दिशांनी पुढे जात असून, तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रेसर राष्ट्र होण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. देशातली एकूण तंत्रज्ञान इनक्युबेशन केंद्रे 2014 साली साधारण 150 होती जी आता 650 च्या वर पोहोचली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत आता भारत, 81 व्या स्थानापासून 40 व्या स्थानापर्यंत पोहोचली आहे. आज देशातील  अनेक युवक, स्वत:च्या कंपन्या आणि स्टार्टअप्स स्थापन करत आहेत, याबद्दल त्यांनी  गौरवोद्गार काढले.

2014 या वर्षासोबत तुलना करतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं, की तेव्हा देशात साधारण 100 स्टार्ट अप्स होते आणि  आता 1 लाखांपेक्षा जास्त अधिकृत स्टार्ट अप्स आहेत. आणि यामुळे भारत, जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप व्यवस्था असलेला देश ठरला आहे. भारताच्या क्षमता आणि गुणवत्ता यावर भर देत, ज्यावेळी, संपूर्ण जग आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात असतांना,  भारताने ही वृद्धी नोंदवली आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले. सध्याचा काळ धोरणकर्ते, वैज्ञानिक समुदाय, संशोधन प्रयोगशाळा आणि खाजगी क्षेत्र अशा सर्वांसाठी अतिशय मोलाचा असल्याचे सांगत, जरी विद्यार्थ्यांना, शाळा ते स्टार्ट अप प्रवास उपलब्ध करुन दिला तरी, या सर्व भागधारकांनीही, विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यासाठी आपण सर्वतोपरी पाठबळ देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा सामाजिक अर्थ लक्षात घेऊन पुढे वाटचाल करतो, तेव्हा, तंत्रज्ञान सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन बनते, असेही पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान, हे समाजातील असमतोल दूर करण्याचे आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याचे साधन ठरते, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते, आणि डेबिट, क्रेडिट कार्डस वगैरे प्रतिष्ठेच्या गोष्टी होत्या, अशा काळाचे त्यांनी स्मरण केले. मात्र आज, युपीआय, वापरण्यास सोपे असल्याने, त्याचा सहज वापर ‘न्यू नॉर्मल’  ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. आज जगभरात सर्वाधिक डेटाचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असेही त्यांनी सांगितले. त्यातही ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण शहरी लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. जेएएम  त्रिवेणी,जीएएम पोर्टल, कोविन पोर्टल, ई-नाम अशा पोर्टलच्या माध्यमातून तंत्रज्ञान सर्वसामावेशकतेचे वाहक ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर समाजाला ताकद देतो, असे सांगत, आज सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि लोकांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सेवा दिल्या जात आहेत. ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र, ई-पाठशाला, आणि दीक्षा सारखे ई-शिक्षण प्लॅटफॉर्म, शिष्यवृत्ती, नोकरीच्या काळात सार्वत्रिक उपलब्धता क्रमांक, वैद्यकीय उपचारांसाठी ई-संजीवनी आणि वयोवृद्ध नगरिकांसाठी जीवनप्रमाण पत्र, अशा सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्येक पावलावर मदत केली जात आहे, असे पंतप्रधान  म्हणाले. तसेच सहज पारपत्र, डिजी यात्रा आणि डिजी लॉकर हे उपक्रम सामाजिक न्याय सुनिश्चित करणारे आणि लोकांचे जीवनमान सुखकर करणारे आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या जगात आज सर्वत्र ज्या वेगाने बदल घडत आहेत, त्यांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की,  जगाच्या या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासोबत भारतातील युवावर्गाने  देखील आपला वेग कायम ठेवला आहे, इतकेच नाही काही बाबतीत तर  त्या वेगाच्याही पलीकडे आपले  युवक  गेले आहेत. 

कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरले आहे. आज आरोग्य क्षेत्रात अमर्याद संधी आहेत, ड्रोन तंत्रज्ञान, उपचारशास्त्र अशा क्षेत्रात नवनवे अभिनव प्रयोग सुरु झाले आहेत. आणि अशा क्रांतीकारक तंत्रज्ञानात भारताने पुढाकार घ्यायला हवा,असेही ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या उद्दिष्टाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी, ‘इनोव्हेशन फॉर डीफेन्स’  – म्हणजेच आयडेक्स चा उल्लेख केला. संरक्षण मंत्रालयाने, आयडेक्स कडून 350 कोटी रुपयांची 14 अभिनव उपकरणे खरेदी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, पंतप्रधानांनी आय-क्रिएट सारखे उपक्रम  आणि डीआरडीओच्या युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा, यांचा उल्लेख करत अशा प्रयत्नांमधून तंत्रज्ञानाला नव्या दिशा मिळत आहेत, असे ते म्हणाले. अवकाश क्षेत्रातल्या सुधारणाबद्दल बोलतांना  पंतप्रधान म्हणाले की, भारत जागतिक ‘गेम चेंजर’ म्हणून उदयास येत आहे आणि एसएसएलव्ही आणि पीएसएलव्ही ऑर्बिटल प्लॅटफॉर्म सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला आहे. अंतराळ क्षेत्रातील तरुणांना आणि स्टार्टअप्सना नवीन संधी उपलब्ध देण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. कोडिंग, गेमिंग आणि प्रोग्रामिंग या क्षेत्रांमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यावरही त्यांनी भर दिला. सेमीकंडक्टर्ससारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आपला ठसा उमटवत असताना सरकार राबवत असलेल्या पीएलआय योजनेसारख्या धोरण-स्तरीय उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.  

नवोन्मेष आणि सुरक्षा यामध्ये हॅकॅथॉनच्या भूमिकेवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सरकार सातत्याने हॅकॅथॉन संस्कृतीला प्रोत्साहन देत असल्याचे अधोरेखित केले ज्यामध्ये विद्यार्थी सातत्याने नव्या आव्हानांवरील तोडगे शोधत असतात. यासाठी एक नवीन चौकट तयार करण्याची आणि विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक पाठबळ देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. अटल टिंकरिंग लॅब्जमधून बाहेर पडणाऱ्या युवा वर्गासाठी एक संस्थात्मक प्रणाली तयार करण्याची त्यांनी सूचना केली. आपण देशात विविध भागात अशाच प्रकारच्या 100 प्रयोगशाळांची निवड करू शकतो का ज्या युवा वर्गाकडून चालवल्या गेल्या पाहिजेत, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. स्वच्छ ऊर्जा आणि नैसर्गिक शेती या क्षेत्रांवर भर दिला जात असल्याचे अधोरेखित करत संशोधन आणि तंत्रज्ञान यावर पंतप्रधानांनी भर दिला.  आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताहाच्या माध्‍यमातून या सर्व शक्यता प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, असा विश्वास व्यक्त केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.   

भारत हे ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘अहिंसा परमो धर्म’ यांवर विश्वास ठेवणारे शांतताप्रिय राष्ट्र असले तरी ते कोणालाही आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला आणि एकात्मतेला धक्का पोहोचवू देणार नाही, हा संदेश 1998 च्या पोखरण अणुचाचण्यांनी जगाला दिला, असे प्रतिपादन प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा देशाचे तांत्रिक यश अधोरेखित करतानाच वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याची प्रेरणा असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले आणि ते सामर्थ्याचा स्त्रोत असल्याचे सांगितले.

नवी दिल्लीतली प्रगती मैदान (सभागृह क्र 5 आणि 4) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अटल नवोन्मेष अभियान, नीती आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, जैव तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान विभाग, दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग ही संबंधित मंत्रालये आणि विभाग या भव्य प्रदर्शनात सहभागी आहेत.

या प्रदर्शनात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे दालन उभारण्यात आले असून यामध्ये कार्यक्रमाच्या संकल्पनेशी सुसंगत, 30 पेक्षा जास्त संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळासंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पाच युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा (डीवायएसएल), तंत्रज्ञान विकास निधी (टीडीएफ), डीआरडीओ उद्योग शिक्षण उत्कृष्टता केंद्र (डीआयए -सीओई ) आणि ब्राह्मोस प्रणाली या स्वदेशी डिझाइन आणि विकसित प्रणाली तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि यासंदर्भातली माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अलीकडच्या वर्षांत उद्योगांच्या सहकार्याने विकसित केलेली उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत. तंत्रज्ञान विकास निधी आणि डीआरडीओ उद्योग शिक्षण उत्कृष्टता केंद्र अंतर्गत 12 एमएसएमई आणि उद्योग सहभागी झाले आहेत.

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923405) Visitor Counter : 156