संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलाच्या वारसा आणि तंत्रज्ञान विषयक प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या वारसा केन्द्राचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते चंदीगडमध्ये उद्‌घाटन


भारतीय हवाई दलाच्या जवानांच्या त्याग आणि अमूल्य योगदानाला ही मानवंदना असल्याचे राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार

हे वारसा केंद्र भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल :संरक्षण मंत्री

Posted On: 08 MAY 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 08 मे 2023 रोजी चंदीगडमध्ये भारतीय हवाई दलाच्या  (IAF) वारसा केंद्राचे उद्घाटन केले. भारतीय हवाई दलाच्या  समृद्ध इतिहासाचे आणि वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या या केंद्रामध्ये विविध कलाकृती, भित्तीचित्रे आणि 3D प्रतिकृतींचा संग्रह आहे.भारतीय हवाई दलाच्या  स्थापनेपासून यात कशी उत्क्रांती होत केली याचं दर्शन घडवले आहे.तसेच शौर्यगाथा आणि विमान/उपकरणे यामध्ये देशाने केलेली तंत्रज्ञान विषयक प्रगतीही दाखवली आहे.

केंद्राच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भारतीय हवाई दलाच्या मानाच्या लढाऊ  विमानाच्या प्रतिकृतीची अनुभूती. यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खऱ्या विमानात वैमानिक म्हणून बसल्याचा थरार अभ्यागतांना अनुभवता येतो. आता हे केंद्र, लोकांसाठी खुले केले आहे. यात आयएएफने भाग घेतलेल्या युद्ध मोहिमांना समर्पित वस्तूदेखील आहेत.देशाच्या रक्षणासाठी आयएएफने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जाणून घेण्याची अनोखी संधी अभ्यागतांना हे प्रदान करते.

हे वारसा केन्द्र आयएएफमध्ये सेवा केलेल्या सर्वांच्या धैर्य आणि समर्पणाचा पुरावा आहे; त्यांच्या बलिदानाला आदरांजली आणि देश रक्षणासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण, असे संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी 1948 चे युद्ध, 1961चे गोवा मुक्तीसंग्राम , 1962, 1965, 1971 आणि कारगिल युद्धातील आयएएफच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांनी सैन्याची ताकद, वचनबद्धता आणि व्यावसायिकता दर्शविली आहे असे सिंह  यांनी सांगितले.

1971 च्या युद्धाबाबत राजनाथ सिंह म्हणाले की युद्धादरम्यान तिन्ही सेैन्यदलांनी दाखवलेला समन्वय, एकात्मता आणि वचनबद्धता अभूतपूर्व आणि विलक्षण होती. हे युद्ध कोणत्याही भूमीसाठी किंवा सत्तेसाठी नाही, तर मानवता आणि लोकशाहीसाठी लढले गेले.  कोठेही अन्याय होणे हा सर्वत्रच न्यायासाठी धोका आहे यावर भारताचा विश्वास आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे याचा हा पुरावा होता असे ते म्हणाले.  आपल्या रणनीतींच्या बळावर युद्ध जिंकणे आणि तेथे कोणतेही राजकीय नियंत्रण न लादणे हे भारताच्या सामर्थ्याचे तसेच त्याची मूल्ये आणि सांस्कृतिक उदारतेचे प्रतीक आहे, हे केंद्र या शौर्याचे आणि वचनबद्धतेचे प्रतिबिंब असेल असे ते म्हणाले.

भविष्यातील पिढ्यांसाठी हे केंद्र प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल, असे प्रतिपादन संरक्षण मंत्र्यांनी केले.  आयएएफकडे समृद्ध वारसा आहे आणि तो  जतन करणे आणि प्रदर्शनरूपाने तो समोर आणणे  ही आपली जबाबदारी आहे. हे केंद्र भारतीय हवाई दलाचा  इतिहास जतन करण्याचे आणि सशस्त्र दलांची मूल्ये आत्मसात करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे एक महत्त्वाचे साधन बनेल, असे ते म्हणाले.

पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित तसेच हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यावेळी उपस्थित होते.

 

 

S.Kakade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1922570) Visitor Counter : 145