गृह मंत्रालय

एनडीएमसीच्या 4400 कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान; विविध विकास प्रकल्पांचेही केले उद्‌घाटन

Posted On: 03 MAY 2023 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2023

नवी दिल्ली महानगर पालिकेच्या 4400 कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केल्यानंतर केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज, नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, तसेच नवी दिल्लीतील विविध विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते.

यावेळी, अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी, दैनंदिन जगण्यातील अनेक अडथळे दूर करत लोकांचे जीवनमान अधिक सुखकर केले आहे. म्हणूनच, वयोवृद्ध, मुले आणि युवा असे सर्वच वयोगटातील लोक, मोदी हैं तो मुमकिन हैं’ असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र यांनी स्वतः लक्ष घालून, केंद्र सरकारमधील सर्व मंत्रालयातील नोकरीची परिस्थिती आणि भरतीचे नियम यात काळानुरूप बदल करण्यावर भर दिला आहे. परिणामी, मोदी यांनी केवळ 4400 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेच्या सुविधा दिल्या नाहीत, तर भविष्यातही, अनेक नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे अमित शाह म्हणाले.

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे, समाजाच्या मागासवर्गातील घटकांना आज गौरव, सन्मान आणि त्यांच्या भविष्याची शाश्वती मिळाली आहे. ते म्हणाले सध्या अमृतकाळात भारताकडे जी 20 चे अध्यक्षपद आहे, तुमच्यात असलेल्या असामान्य उत्साहानेच दिल्ली सुशोभित होईल. शाह म्हणाले की नवी दिल्ली महानगर पालिकेचे कार्यक्षेत्र अतिशय महत्वाचे आहे, कारण देशाची धोरणं इथे ठरवली जातात, विदेशी पाहुणे इथे भेट देतात आणि हा भारताचा संदेश आणि भारतीयत्वाचा सुगंध जगभरात पसरविण्यासाठी हे शहर अतिशय महत्वाचे आहे. 43 चौरस किमीच्या परिसराला आणि तिथे राहणाऱ्या लाखो लोकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवणे ही एनडीएमसीची जबाबदारी आहे, असे शाह म्हणाले.अमित शाह म्हणाले की नवी दिल्ली नगर परिषदेचे (एनडीएमसी) काम देशभरातील नगर परिषदांमध्ये सर्वोत्तम मानले जाते आणि एनडीएमसी हे AA+ क्रेडिट रेटिंग सह (पत मानांकन) आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. कमीत कमी पर्यावरणीय प्रभावासह त्याचा विकास करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, एनडीएमसीच्या 13,000 कर्मयोगींच्या या चमू मध्ये आज 4400 लोकांचा अधिकृतपणे समावेश झाला आहे. ते म्हणाले की, हे 4400 कर्मयोगी, नावापेक्षा त्यांच्या कामावरून ओळखले जातात. स्वच्छता असो, की हिरवाईने समृद्ध परिसराची निर्मिती असो, की अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे असो, या 4400  कर्मयोगींचे प्रयत्न आणि एनडीएमसी बद्दलचे त्यांचे समर्पण आणि परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. ते म्हणाले की, या लोकांना ते घेत असलेल्या कठोर परिश्रमांमुळे ओळखले जात होते, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना या ओळखी बरोबर सन्मान आणि सुरक्षा देखील दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी, कर्मचारीभरती नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यात गृह मंत्रालय आणि डीओपीटीच्या अधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की सुमारे 900 अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आली असून, त्यानंतर 4,400 लोकांना नियमित करता येईल. ते म्हणाले की, नियमित करण्यात आल्यावर या कर्मचाऱ्यांना सरासरी रु. 32,000 वेतनाची हमी दिली जाईल, तर काही लोकांना त्यापेक्षा जास्त वेतन देखील मिळेल. याव्यतिरिक्त, एनडीएमसी, एलटीसी ची रोकड रहित आरोग्य योजना, पदोन्नतीच्या संधी आणि एनडीएमसी च्या सरकारी निवास योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार सुनिश्चित केला जाईल. या कर्मचाऱ्यांना या सर्व सुविधा फार पूर्वीच उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे आता त्यांना हे अधिकार मिळाले आहेत, असे ते म्हणाले.पुष्प विहार गृहनिर्माण संकुलात 120 नवीन फ्लॅट्सचे उद्घाटनही आज झाले आहे. शिवाय, रणजितसिंग उड्डाणपूल आणि सफदरजंग उड्डाणपुलाची दुरूस्ती आणि सुशोभीकरणही हाती घेतले जात आहे, असे अमित शाह म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक क्षेत्रांत विकासाचा पाया रचत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  2014 पूर्वी नागरी विकासासाठी शासनाचे कोणतेही धोरण नव्हते.  2014 नंतर मात्र मोदी यांनी सर्व क्षेत्रांचा विकास करण्याची जबाबदारी उचलली आणि सर्वसमावेशक, परिणामकारक आणि एकात्मिक शहरी विकास धोरण तयार केले.  प्रशासन, पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता, शहरी गरीब लोकांचे कल्याण आणि शहरांमधील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन या 5 स्तंभांवर हे धोरण आधारित आहे.

यासोबतच केंद्र सरकारने अमृत मिशन, स्थावर मालमत्ता नियामक (रेरा) कायदा, मेट्रो नेटवर्क आणि इलेक्ट्रिक बस यासारख्या अनेक योजनांद्वारे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम केले, त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा आणि पर्यावरण सुधारण्यास मदत झाली असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हरित ऊर्जा, स्वच्छ भारत अभियान आणि सार्वजनिक शौचालये, स्वच्छ ऊर्जा, सौर छत आणि एलईडी दिवे यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देऊन शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सुमारे दीड कोटी शहरी गरिबांच्या कल्याणासाठी घरे बांधण्यात आली आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवले आहे, तर त्यांना सहजपणे पैशाचे व्यवहार करता यावेत यासाठी त्यांना डिजिटल माध्यमातून बँकिंग सुविधांशी जोडण्यात आले आहे, असे शाह यांनी नमूद केले.

पंतप्रधानांच्या प्रभावी नगर विकास धोरणामुळे आता शहरांचा कायापालट होत आहे, असे शाह यांनी सांगितले.  आगामी काळात नवी दिल्ली म्युनिसिपल कमिटीला (एनडीएमसीला) अधिक बळकट करणे आवश्यक आहे, सेवांना अधिक विशिष्ट आणि तपशीलवार स्वरूप दिले पाहिजे आणि संपूर्ण एनडीएमसी परिसरात स्वच्छतेची संस्कृती रुजवावी लागेल, असे त्यांनी सुचवले. मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आज 4400 कर्मचाऱ्यांच्या जीवनात उत्साह आणि नवीन आशेचा किरण निर्माण झाला आहे, असेही शाह म्हणाले.

 

 

 

 S.Patil/Radhika/Rajashree/Prajna/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921822) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi