शिक्षण मंत्रालय

1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा 63 वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा


देशभरातील सर्व राज भवनांमध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांसह महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे वर्धापन दिन साजरे करून भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा

Posted On: 01 MAY 2023 8:33PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी आज, 1 मे रोजी दोन्ही राज्यांचा 63वा वर्धापन दिन साजरा केला. या प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याला समृध्द संस्कृती आणि मेहनती जनतेची देणगी लाभली असून या राज्याने विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे.  महाराष्ट्राच्या येत्या काळातील सातत्यपूर्ण प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.

आणखी एका ट्विट संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात, गुजरात राज्य वर्धापन  दिनाच्या शुभेच्छा. गुजरात राज्याची सर्वांगीण प्रगती तसेच वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती यांच्यामुळे या राज्याने सर्वांवर आपला ठसा उमटवला आहे. हे राज्य येत्या काळात विकासाच्या नवनव्या उंचीवर गाठत राहो अशी प्रार्थना मी करतो.

गुजरात : 

1111111111

महाराष्ट्र  पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या वर्धापन  दिनानिमित्त या दोन्ही राज्यांमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आपले सरकार समाजाच्या सर्व घटकांसह सर्व समावेशक विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्वांनी एकत्र येऊन नवा तसेच सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करावा असे मी आवाहन करतो, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. राज्याच्या 63 व्या वर्धापन  दिनानिमित्त मुंबईत राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी राज्यपालांनी तिरंगा झेंडा फडकवला आणि संचलन कार्यक्रमाचे निरीक्षण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी राज्यभरातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या कल्याणकारी तसेच विकासविषयक उपक्रमांची माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, विविध देशांचे सल्लागार आणि राजदूत यांच्यासह राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुजरात राज्याचा 63 वा वर्धापन  दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रमांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली जामनगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी  जामनगर येथे विशेष संचलन आणि विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

भारताच्या विविधतेतील एकताया संकल्पनेचा उत्सव साजरा करणाऱ्या एक भारत, श्रेष्ठ भारतच्या प्रेरणेनुसार, देशभरातील राजभवनांमध्ये (राज्यपालांची निवासस्थाने) महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची समृद्ध आणि चैतन्यमयी संस्कृतीचे दर्शन घडवत अत्यंत उत्साहाने या राज्यांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

दिल्लीमध्ये राज निवासात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा वर्धापन  दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी देशाच्या वाढीत आणि विकासात या दोन्ही राज्यांनी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक केले.

राजभवनात एक तासभर चाललेल्या या कार्यक्रमात दिल्ली परिसरात राहणाऱ्या या दोन्ही राज्यांतील विविध थरांतील लोकांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी कार्यक्रम सादर केले.

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची लोककला असलेली अनुक्रमे लावणी आणि गरबा ही नृत्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींचे नायब राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस.अब्दुल नझीर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तसेच गुजरात मंडळांच्या सदस्यांसह राज्य वर्धापन  दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विजयवाडा येथील राजभवनात, दरबार हॉलमध्ये एक भारत, श्रेष्ठ भारतसंकल्पनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी राज्यपाल म्हणाले, भारताला त्याचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेचा अभिमान आहे.महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की ही दोन्ही राज्ये त्यांचा चैतन्यपूर्ण सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि स्वादिष्ट पाककृतींसाठी प्रसिद्ध आहेत. राजभवनातील कार्यक्रमात सुरुवातीला आंध्रप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या अधिकृत राज्यगीतांचे प्रस्तुतीकरण झाले आणि त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी भरतनाट्यम तसेच गरबा नृत्ये सादर केली.

  

पुदुचेरीचे नायब राज्यपाल डॉ. तामिली साई सुंदरराजन यांच्या यजमानपदात, पुदुचेरी येथील राजनिवासामध्ये, गुजरात सांस्कृतिक संघाच्या सहयोगाने, महाराष्ट्र आणि गुजरात वर्धापन  दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या देशात भाषा, संस्कृती, खाण्याच्या सवयी आणि राज्यांच्या सीमा यांच्या बाबतीत भिन्नता असू शकेल पण आपण सर्वजण भारतीय असल्याच्या अभिमानी भावनेने एकमेकांसोबत एकत्र उभे असतो यावर नायब राज्यपालांनी अधिक भर दिला. याप्रसंगी गुजरातमधील दांडिया सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या राज्य वर्धापन  दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत भारताच्या एकतेचा उत्सव म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील यावेळी उपस्थित होते.

ओडिशा राजभवनातही आज गुजरात आणि महाराष्ट्राचा वर्धापन  दिवस साजरा करण्यात आला. ओडिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेशी लाल हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. एखाद्या राज्याचा वर्धापन  दिन इतर राज्यांमध्ये साजरा केल्याने एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ होईल तसेच आपले सामाजिक, सांस्कृतिक नाते अधिक समृद्ध होईल, असे राज्यपाल यावेळी म्हणाले. या उत्सवात गुजराती आणि मराठी समाजातील सदस्य सहभागी झाले होते.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल के.टी. पारनाईक यांनी, देशाच्या विविध भागांतील लोकांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी अरुणाचल प्रदेश राजभवन येथे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य वर्धापन  दिन साजरा केला. राज्यपालांनी गुजरात आणि महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या लोकांचे अरुणाचल प्रदेशशी घट्ट नाते असल्याचे सांगितले. राजभवनात झालेल्या या सोहळ्याला गुजराती आणि मराठी समाजातील लोक उपस्थित होते. या लोकांनी आपले अनुभव, कामगिरी आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांसाठीच्या सदिच्छा राज्यपाल आणि राज्याच्या प्रथम महिला यांच्यासोबत सामायिक केल्या. यावेळी खास गुजराती आणि मराठी खाद्यपदार्थांसह चहापानाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन्ही राज्यांच्या वर्धापन  दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुजरात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पंजाबचे राजभवन उत्साहाने ओतप्रोत झाले होते. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेनुसार विविधतेतील एकतेच्या बंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही राज्यांचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक विविधता या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली.

हरियाणामध्ये, राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी आज हरियाणा राजभवनात गुजरात आणि महाराष्ट्र राज्य वर्धापन  दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पाहुण्यांशी थेट संवाद साधला.

गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली इतिहास आहे, असे झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, गुजरात आणि महाराष्ट्र वर्धापन  दिनानिमित्त राजभवन येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. या राज्यांनी देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गुजरातचे गरबा नृत्य, मराठी समाजाच्या वंदना धामोरी यांचे भजन, लोहरदगाचे उपायुक्त डॉ. वाघमारे प्रसाद कृष्णा यांचे गायन सादर करण्यात आले.

भारताला सांस्कृतिक सातत्य असून त्यामध्ये प्रादेशिक भिन्नता असली तरीही मूलभूत मूल्ये मात्र समान आहेत. याच मूल्यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत' च्या भावनेला मूर्त रूप दिले आहे, असे गुजरात आणि महाराष्ट्राच्या वर्धापन  दिनाच्या समारंभात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. आपल्या भाषणात म्हणाले. या दोन्ही राज्यांतील रहिवाशांनी आता तामिळनाडूला आपले घर मानले आहे अशा अभ्यागतांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ राजभवनात पारंपरिक पंचरीमेलमसह महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या उत्सवात सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोची आणि तिरुवनंतपुरम येथील नर्तकांनी गरबा आणि दांडिया नृत्य सादर केले.

राजस्थानमध्ये राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राजभवन येथे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या वर्धापन  दिन सोहळ्याला संबोधित केले. भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे आणि विविध संस्कृती असूनही आपण सर्व एक आहोत, असे ते यावेळी म्हणाले. एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आत्मसात करून सर्व देशवासियांनी समरस समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करावे, असे ते म्हणाले. दोन्ही राज्यांचा गौरवशाली इतिहास असून त्यांची समृद्ध संस्कृती आणि चैतन्यशील परंपरा आपल्या राष्ट्राचा अविभाज्य भाग आहेत असे मिश्रा यांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेला त्यांच्या राज्यांच्या वर्धापन  दिनानिमित्त शुभेच्छा देताना सांगितले.

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत राजभवन येथे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा वर्धापन  दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी आगरतळा येथील राजभवनात आयोजित गुजरात आणि महाराष्ट्र स्थापन दिनाच्या उत्सवाचे उद्घाटन केले.

छत्तीसगडचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गुजरात आणि महाराष्ट्राचा राज्य वर्धापन  दिवस साजरा करताना छत्तीसगड राजभवन आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले होते.

जम्मूमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन  दिनानिमित्त गुजरात आणि महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारताच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील स्वातंत्र्यसैनिक, शहीद तसेच महान व्यक्तींना नायब राज्यपालांनी विनम्र अभिवादन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत हा भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवण्यासाठी तसेच परस्पर सामंजस्य आणि आदराची भावना वाढवण्यासाठी राबवला जात असलेला भारत सरकारचा एक उपक्रम आहे. या उपक्रमात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांशी जोडून कला, संगीत, नृत्य, भोजन, क्रीडा यासारख्या क्षेत्रांशी संबंधित विविध उपक्रमांद्वारे त्यांच्यातील सांस्कृतिक आणि भाषिक देवाणघेवाण वाढवली जाते. गुजरात आणि महाराष्ट्राच्या वर्धापन  दिनाचा उत्सव इतर राज्यातील राजभवनांनी साजरा करणे हे राष्ट्रीय एकात्मतेच्या संवर्धनासाठी उचललेले एक अनोखे पाऊल आहे.

***

S.Patil/S.Chitnis/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921289) Visitor Counter : 280


Read this release in: English , Urdu , Hindi