विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लंडन स्थित जम्मू आणि काश्मीरच्या मूळ रहिवाशांचे सामाजिक गट आणि विद्यार्थ्यांशी एका विशेष बैठकीत साधला संवाद
Posted On:
01 MAY 2023 3:46PM by PIB Mumbai
सध्या युनायटेड किंगडमच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लंडनस्थित जम्मू आणि काश्मीरच्या मूळ रहिवाशांचे सामाजिक गट आणि विद्यार्थ्यांशी एक विशेष संवादात्मक बैठक घेतली.

सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत, मंत्र्यांचा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ उधमपूरसह जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विविध क्षेत्रांतील वेगवेगळ्या कामात गुंतलेले लोक सहभागी झाले होते. नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय असलेल्या लंडनमधील जम्मू आणि काश्मीर स्टडी सेंटर शाखेचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरच्या डोग्रा संघटनांचे सदस्य आणि काश्मिरी पंडित कार्यकर्ते गटांचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.
भारताविषयी विशेषत: जम्मू-काश्मीरच्या संदर्भात काही अंतस्थ हेतूने केलेले नकारात्मक वक्तव्य दुरुस्त करण्यात या सर्वांनी ज्या प्रकारे योगदान दिले आहे त्याचे तसेच युनायटेड किंगडममधील भारतविरोधी शक्तींना आव्हान देण्यासाठी उभे ठाकणाऱ्यांचे डॉ जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भूतकाळातील 1947 पासून निरंतर सत्तेवर असलेल्या सरकारचा वारसा असलेल्या अनेक विसंगती सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. कलम 370 रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमधील जनतेत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे आणि त्यांना उर्वरित देशातील त्यांच्या समकक्ष नागरिकांप्रमाणे समान अधिकार मिळाले आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी निर्वासितांना आणि जम्मू काश्मीरच्या मुलींना न्याय मिळवून दिला. या सर्वांना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, असे डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी अवलंबलेल्या सुधारणाकारक उपाययोजनांमुळे जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे आणि भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेबाबत कोणतीही संदिग्धता उरलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्याशी संवाद साधणाऱ्या विविध गटांनी त्यांना भारतविरोधी शक्तींच्या विरोधात सर्व भारतीय गटांना एकत्र आणण्यासाठी अलीकडच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. वेळोवेळी घेतलेली चर्चासत्र आणि विचारवंतांसोबतच्या बैठकांव्यतिरिक्त ब्रिटीश संसदेतील विविध संसद सदस्यांशी त्यांच्या संवादाची थोडक्यात माहिती या सदस्यांनी मंत्र्यांना दिली. आपल्या विरोधकांनी रचलेल्या खोट्या वक्तव्याचा वरचष्मा होऊ नये, यासाठी आता आपले वस्तुस्थितीदर्शक वक्तव्य देखील तयार करण्याची वेळ आली आहे, असा सल्ला डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिला.
डॉ जितेंद्र सिंह युनायटेड किंगडमच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1921221)